डेंग्यूचा डंख : मनुष्यबळाअभावी महापालिकेची दमछाकाू
By Admin | Updated: July 27, 2016 00:22 IST2016-07-27T00:04:00+5:302016-07-27T00:22:19+5:30
सिडको - सातपूर रेड झोन

डेंग्यूचा डंख : मनुष्यबळाअभावी महापालिकेची दमछाकाू
नाशिक : पावसामुळे शहरात डेंग्यूच्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महापालिकेने घरोघरी सुरू केलेल्या शोध मोहिमेत सिडको आणि सातपूर विभागांत डेंग्यूच्या एडिस इजिप्टी डासांच्या अळ्यांचे प्रमाण सर्वाधिक आढळून आल्याने आरोग्य व वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. सद्य:स्थितीत ‘रेड झोन’मध्ये असलेल्या सिडको-सातपूर विभागातील औद्योगिक वसाहतींसह बांधकाम व्यावसायिकांनाही महापालिकेने आवाहन करत प्रबोधनावर भर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात आतापर्यंत ९२ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी असली तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने संख्या अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेने मंगळवारी (दि.२६) शहरातील २६ रुग्णांचे रक्तजलनमुन्यांची तपासणी केली असता त्यातील १६ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. १ ते २६ जुलै या कालावधीत ९२ रुग्णांना डेंग्यूने पछाडले आहे. पावसाळ्यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेने घरोघरी डेंग्यूच्या एडिस इजिप्टी जातीच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी महापालिकेचे सुमारे २२५ कर्मचारी कार्यरत आहेत.
दि. १५ ते २३ जुलै या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत महापालिका कर्मचाऱ्यांनी २६ हजार ४५३ घरांना भेटी दिल्या. त्यातील २७४ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. तसेच ६५ हजार ७१६ पाणीसाठे तपासले असता त्यातील ३१३ पाणीसाठ्यांमध्ये डेंग्यूच्या अळ्या निदर्शनास आल्या. कर्मचाऱ्यांनी १४४ ठिकाणी पाणी फेकून दिले, तर १७२ ठिकाणी अॅबेटिंग औषधाचा मारा केला. प्रामुख्याने, सिडको व सातपूर विभागांत प्रत्येकी ९८ ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. पश्चिममध्ये ५४, नाशिक पूर्व - २९, पंचवटी - १५ आणि नाशिकरोड विभागात १६ ठिकाणी अळ्या आढळून आल्याने त्या नष्ट करण्यात आल्या. सिडको - सातपूरमध्ये बव्हंशी कामगार वस्ती आणि छोट्या घरांमध्ये कुटुंबसंख्या जास्त असल्यामुळे पाणी साठवून ठेवले जाते.