‘दबंग’ पोलिसाचा विद्यार्थ्यावर दंडुका
By Admin | Updated: January 12, 2017 01:14 IST2017-01-12T01:14:32+5:302017-01-12T01:14:43+5:30
कॉलेजरोड : संतप्त मित्रांकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी

‘दबंग’ पोलिसाचा विद्यार्थ्यावर दंडुका
नाशिक : ‘दबंगगिरी’ करणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या बिटमार्शल पोलिसाने बुधवारी (दि.११) दुपारच्या सुमारास पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला बीवायके महाविद्यालयासमोर भर रस्त्यात दंडुक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
निफाड तालुक्यातील शिवडी येथे राहणारा वैभव शिवाजी क्षीरसागर (२३) हा विद्यार्थी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बीवायके महाविद्यालयातून स्नेहसंमेलन आटोपून घरी जाण्यासाठी निघाला होता. यावेळी महाविद्यालयातून मोठ्या संख्येने विद्यार्थी बाहेर पडल्याने कॉलेजरोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. यावेळी गस्तीवर असलेले गंगापूर पोलीस ठाण्याचे ‘बिट मार्शल’ पल्सरवरून (एमएच १५, एए ८२५८) आले. यावेळी मागे बसलेल्या पोलीस शिपायाने काठीने वैभवच्या पायावर मारले. यावेळी त्याने ‘सर, तुम्ही मला का मारता’ असे विचारल्यावर संबंधित शिपायाने ‘तू भाई आहेस का ?’ असा उलट प्रश्न करून पुन्हा काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, मुका मार लागल्याने त्याला चालणे कठीण झाले होते.
या मारहाणीत त्या ‘दबंग’ पोलिसाने मला बेदम मारहाण केल्याचा आरोप वैभवने केला आहे. सदर प्रकार त्याच्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या अस्वस्थ वैभवला उचलले. यावेळी मित्रांनीदेखील त्या ‘दबंग’ला मारहाणीचे कारण विचारले असता त्याने ‘तुम्ही सर्व गंगापूर पोलीस ठाण्यात चला, तेथे तुम्हाला दाखवितो’ असा सज्जड दम भरला. मित्रांनी जखमी वैभवला तातडीने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)