उमेदवारांच्या प्रचाराला दांडियाचा हातभार

By Admin | Updated: September 30, 2014 23:47 IST2014-09-30T23:43:33+5:302014-09-30T23:47:44+5:30

गरबा ठिकाणी भरविल्या जातात सभा

Dandiya's contribution to the campaigning of candidates | उमेदवारांच्या प्रचाराला दांडियाचा हातभार

उमेदवारांच्या प्रचाराला दांडियाचा हातभार

नाशिक : निवडणूक आचारसंहितेमुळे प्रचारावर आलेले विविध प्रकारची बंधने पाहता, उमेदवारांनी त्यावरही शक्कल लढवून प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरण्यास सुरुवात केली असून, सणासुदीच्या दिवसांत घरोघरी जाऊन प्रचार करण्याऐवजी नवरात्रोत्सवात रात्री चौकाचौकांत भरणाऱ्या दांडियालाच हजेरी लावण्यावर भर दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना जेमतेम दोन आठवडे मिळणार असून, त्यातही सणासुदीचे मतदारांना वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत जाहीर सभा, चर्चा, परिसंवाद अथवा उमेदवाराकडून केल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रचारात सहभागी होण्याची मानसिकता बदललेली आहे. मतदारांच्या प्रतिसादाअभावी उमेदवारांनाही त्यांच्या विजयाचे आडाखे बांधण्यात अडचणी निर्माण होत असून, कोणत्या भागावर लक्ष केंद्रित करावे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे शक्यतो गटागटांच्या बैठका घेण्यावर प्रत्येक उमेदवार भर देत आहे. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने आता प्रत्येक मतदाराच्या घरी अथवा संपूर्ण मतदारसंघात प्रचारफेरी काढून मतदारांना आळवणी करण्यासाठीही पुरेसा वेळ नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जात आहे.मतदारसंघातील नवरात्रोत्सव मंडळांची माहिती कार्यकर्त्यांकरवी गोळा करून उमेदवारांकडून त्या-त्या मंडळाला भेट देण्यासाठी उत्सुक असल्याची गळ घातली जात आहे. साधारणत: रात्री ८ ते १० या दोन तासांच्या कालावधीतच ठिकठिकाणी गरबा रंगत असल्यामुळे ते पाहण्यासाठी व खेळण्यासाठीही मतदारांची गर्दी होते. नेमक्या याच वेळेस उमेदवारांकडून मंडळाला भेट देऊन उपस्थित मतदारांना आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांकडून उत्कृष्ट गरबा खेळणाऱ्या स्पर्धकाला बक्षिसांची लयलूट करून त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर काही ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळालाच आर्थिक मदत करून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे नवरात्रोत्सव मंडळांवरही आचारसंहितेचे बंधन असल्याकारणाने कोणत्याही राजकीय पक्षाचे अथवा उमेदवाराचे उघडपणे समर्थन करणारे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आठव्या व नवव्या माळेला रात्री बारा वाजेपर्यंत दांडियाला अनुमती असल्यामुळे खऱ्या अर्थाने या दोन दिवशी उमेदवारांची धावपळ व कसरत होणार आहे, तर उमेदवारांच्या हजेरीमुळे नवरात्रोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांचीही ‘चांदी’ होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dandiya's contribution to the campaigning of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.