दामलेंची दोन वर्षांसाठी रंगभूमीवरून एक्झिट
By Admin | Updated: July 12, 2014 00:25 IST2014-07-11T23:10:22+5:302014-07-12T00:25:11+5:30
दामलेंची दोन वर्षांसाठी रंगभूमीवरून एक्झिट

दामलेंची दोन वर्षांसाठी रंगभूमीवरून एक्झिट
नाशिक : मराठी रंगभूमीवरील विक्रमादित्य असलेला अभिनेता प्रशांत दामले आॅगस्ट २०१४ पासून दोन वर्षांसाठी रंगभूमीवरून एक्झिट घेत असून, दामले यांचे दर्शन पुढील दोन वर्षे छोट्या पडद्यावरील मालिकांमधून होणार आहे. गेल्या वर्षभरापासून दामले अभिनित ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाचा नाशिकमधील शेवटचा प्रयोग येत्या १९ जुलैला, तर अखेरचा प्रयोग २९ जुलैला पुण्यात होत आहे.
प्रशांत दामले यांनी आपल्या अभिनयाने मराठी रंगभूमी समृद्ध केली आणि नाट्यप्रयोगांचे सातत्य राखत वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार, लेकुरे उदंड जाहली, प्रियतमा, चार दिवस प्रेमाचे, आम्ही दोघं राजाराणी, जादू तेरी नजर, बहुरूपी, श्री तशी सौ., सासू माझी ढासू यांसारखी २७ नाटके दामले यांनी केली. डॉ. श्रीराम लागू, वंदना गुप्ते, सुप्रिया पिळगावकर, सतीश तारे, डॉ. गिरीश ओक, प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, भरत जाधव यांच्यापासून ते सुजाता जोशी, रश्मी देव यांच्यापर्यंत विविध कलाकारांसमवेत दामले यांनी भूमिका साकारल्या. १९९२ सालापासून ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे प्रयोग आजही सुरू आहेत. या नाटकाचे आत्तापर्यंत १८८२ प्रयोग झाले आहेत. गेल्यावर्षी रंगमंचावर आलेल्या ‘नकळत दिसले सारे’ या नाटकाचे आतापर्यंत ३६ प्रयोग झाले आहेत, तर ‘एका लग्नाची गोष्ट’नेही रसिकांना नेहमीच आकर्षित केले आहे. या तीनही नाटकांत सध्या दामले भूमिका साकारत आहेत. मध्यंतरी हृदयविकाराच्या धक्क्यानंतर दामले यांनी काही काळ विश्रांती घेतली होती. परंतु आजारपणावर मात करत दामले यांनी पुन्हा एकदा रंगभूमी गाजवायला सुरुवात केली. आता रंगभूमीनंतर छोटा पडदा गाजविण्यासाठी दामले यांनी दोन वर्षे मराठी रंगभूमीवरून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)