जिल्हा परिषद शाळेचे टवाळखोरांकडून नुकसान
By Admin | Updated: July 30, 2016 21:33 IST2016-07-30T21:28:26+5:302016-07-30T21:33:08+5:30
पिळकोस : पालक, शिक्षक, ग्रामस्थांकडून संताप

जिल्हा परिषद शाळेचे टवाळखोरांकडून नुकसान
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या व नवीन स्वच्छतालयाचे, स्वच्छतागृहाचे व शाळेच्या आवाराचे गावातील काही टवाळखोरांकडून सतत नुकसान केले जात असून, शाळा सुटल्यावर गावातील टवाळखोर हे नाहक शाळेच्या आवारात येऊन नुकसान करत असल्याने याबाबत पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाजी जाधव व सरपंच साहेबराव रेवबा जाधव हे अज्ञात टवाळखोरांविरोधात पोलिसांत तक्र ार करणार असून, शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या काळात शाळेच्या आवारात आढळणाऱ्या संशयितांवर गावातील सामाजिक कार्यकर्ते नजर ठेवून असणार असून, शाळेच्या आवारात कुणीही संशयास्पद आढळून आल्यास त्यावर यापुढे कठोर कारवाई करण्याचा निर्णय गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आता घेतला आहे. पिळकोस जिल्हा परिषद शाळा ही गावाच्या बाजूला स्मशानभूमी रस्त्याला असून, गावाच्या शेवटच्या कोपऱ्याला असलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेचे तीन वर्षांपासून काही टवाळखोर तरुणांकडून नाहक नुकसान केले जात आहे. या त्रासामुळे शाळेला चहुबाजूनी संरक्षक भिंतही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीकडून बांधण्यात आली असून, गेटही बसविण्यात आले आहे. या भिंतीला काही ठिकाणी कोणी भिंतीवरून आत येऊ नये यासाठी काचाही लावण्यात आल्या आहेत.
परंतु या टवाळखोरांनी या काचा काढून टाकल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी असलेल्या टाकीचे सर्व नळ तोडण्यात आले आहेत. टाकीही फोडण्यात आली आहे. तसेच शाळेचे गेटही काढून टाकले आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतालयाचे व स्वच्छतागृहाचे पत्रे फोडले असून, नवीन स्वच्छतालयाचे व स्वच्छतागृहाचे पाइपही फोडले आहेत व दरवाजा तोडण्यात आला आहे. या जुन्या स्वच्छतालयाचे व स्वच्छतागृहाचे पूर्णत: नुकसान केले गेले आहे. गावातील काही टवाळखोर शाळा सुटल्यावर शाळेच्या आवारात प्रवेश करतात, क्रि केट खेळतात तसेच शाळेच्या बाजूला असलेल्या आदिवासी वस्तीतील काही जण या शाळेच्या आवारात नुकसान करतात. त्यामुळे शाळेचे सौंदर्य खराब होऊन याचा त्रास शिक्षक व विद्यार्थ्यांना होत आहे.
गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन या प्रकाराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार आहेत. शाळेच्या आवारात नाहक आढळून येणाऱ्या दोन-चार टवाळखोरांना पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हाच आता शेवटचा मार्ग अवलंबिण्याचे राहिले आहे, असे गावकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तीन वर्षांपूर्वी किचन शेडचा दरवाजा अशाच प्रकारे तोडण्यात आला होता.
तसेच शाळेच्या आवारातील रंगरंगोटी व वऱ्हांड्यातील स्वातंत्र्यसैनिकांची रंगवलेली चित्रे विदू्रप केली होती व शाळेच्या भिंतींवरही विद्रूप लिहून ठेवले होते. शाळेला साप्ताहिक सुटी असो वा उन्हाळ्याची सुटी वा दिवाळीची सुटी, त्यावेळेस या शाळेच्या आवारात येणारे टवाळखोर क्रि केट खेळण्यासाठी येऊन नुकसान करतात व त्या काळात शाळेचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होते. शाळेचे तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू असून, नुकसान करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून व गावकऱ्यांकडून जोर धरत असून, टवाळखोरांच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)