वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By Admin | Updated: January 31, 2017 01:38 IST2017-01-31T01:38:30+5:302017-01-31T01:38:45+5:30
वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
सिन्नर : सिन्नर - घोटी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. गस्तीवर असलेल्या सिन्नर पोलिसांच्या सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती देऊन मृत बिबट्या ताब्यात दिला. सिन्नर - घोटी महामार्गावर घोरवड शिवारात देवी मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सुमारे साडेचार वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाला. सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोकरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना गस्तीवर असताना मृत बिबट्याची माहिती समजली. पोलिसांनी पहाटे ४ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. बोडके, वनपाल ए.के. लोंढे यांच्याशी संपर्क साधून मृत बिबट्याची माहिती दिली. वनपाल लोंढे यांच्यासह प्रदीप भांबरे, ए.बी. साळवे, वनरक्षक बोकील, सदगीर, रूपवते यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्या ताब्यात घेतला. सिन्नरचे पशुवैद्यकीय अधिकारी बी.एच. अलकुंडे यांनी शवविच्छेदन केले. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहदरी वनोद्यानात बिबट्याला अग्निडाग देण्यात आला. (वार्ताहर)