सातपूरला डॉक्टरच्या घरावर दरोडा
By Admin | Updated: August 18, 2015 23:53 IST2015-08-18T23:51:32+5:302015-08-18T23:53:08+5:30
डॉक्टर पत्नीवर कोयत्याने हल्ला : सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

सातपूरला डॉक्टरच्या घरावर दरोडा
सातपूर : येथील भरवस्तीत असलेल्या एका डॉक्टरच्या घरावर चौघा दरोडेखोरांनी दरोडा टाकून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि़१७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली़ दरोडेखोरांना डॉक्टर दाम्पत्याने हटकले असता त्यातील एक जण डॉक्टर पत्नीवर कोयत्याने हल्ला करून पलायनाच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ त्यास न्यायालयात हजर केले असता २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सातपूर कॉलनीतील मौले हॉलजवळील संदीपनगरमध्ये डॉ़सुदाम दौलत चौधरी हे कुटुंबासह राहतात़ श्रावणी सोमवार असल्याने त्यांची पत्नी सुलभा चौधरी या मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या़ डॉ़चौधरी यांनी दवाखान्यातील कामकाज आटोपून ते पत्नी व मुलीला घेण्यासाठी मंदिरात गेले़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हे तिघे घरी परतले असता घरातील लाईट सुरू, दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला आढळून आला़
डॉक्टरांच्या घराबाहेर आवाज आल्याने यातील दरोडेखोर एकेक करत घराबाहेर पडत असताना एकास डॉक्टर चौधरी यांनी पकडले, मात्र तो पळून गेला़ मात्र दुसऱ्यास सुलभा चौधरी यांनी घट्ट पकडून ठेवले असता पळून गेलेला एक जण माघारी आला व त्याने डॉक्टरांवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला़ मात्र सुलभा यांनी हा वार हातावर झेलल्याने डॉक्टर थोडक्यात बचावले़ या गोंधळामुळे शेजारील नागरिक मदतीला धावले व त्यांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेला दरोडेखोर विकास सुरेश जाधव (वय २१, रा़जाधव संकुल) यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़
डॉक्टरांच्या घरातून पळून गेलेल्या दरोडेखोरांनी २२ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख २७ हजार रुपये लुटून नेले़ या प्रकरणी डॉ़ सुदाम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, विकास जाधव यास अटक केली आहे़ उर्वरित संशयित अक्षय भारती, दत्तू दंडगव्हाण, शरद पाटील हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत़ (वार्ताहर)