एकवई शिवारात दरोडा

By Admin | Updated: September 25, 2015 23:38 IST2015-09-25T23:37:34+5:302015-09-25T23:38:13+5:30

एकवई शिवारात दरोडा

Dacoity in Ek Shivi Shivar | एकवई शिवारात दरोडा

एकवई शिवारात दरोडा

मनमाड : नांदगाव तालुक्यातील एकवई शिवारात गुरुवारी मध्यरात्रीनंतर बेदाडे वस्तीवर पडलेल्या दरोड्यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून, अज्ञात दरोडेखोरांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे. सदर घटनेमुळे ग्रामीण भागात घबराट निर्माण झाली आहे.
एकवई पानेवाडी रस्त्यावर असलेल्या काशीनाथ बेदाडे यांच्या वस्तीवर रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी बंगल्याच्या आवारात झोपलेल्या बेदाडे कुटुंबाच्या सदस्यांना लाकडी दांडके व दगडांनी जबर मारहाण सुरू केली. हिंदी भाषेमधून बोलत असलेल्या या दराडेखोरांनी धमकावून आरडाओरडा करण्यास मज्जाव
केला.
पोर्चमधे झोपलेले सोमनाथ बेदाडे, जनार्दन बेदाडे, हरणाबाई बेदाडे व भीमाबाई बेदाडे यांच्या हातावर डोक्यावर जबर मारहाण केली. बाहेरचा आरडाओरडा ऐकून घरात झोपलेले काशीनाथ बेदाडे यांनी गच्चीवर धावत जाऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हाका मारल्या. चोरट्यांनी गच्चीवर काशीनाथ यांना दगड मारून आरडाओरडा न करण्यासाठी धमकावले. बाहेर पोर्चमध्ये जनार्दन बेदाडे यांना बेदम मारहाण झाल्याने ते बेशुद्ध पडले. चोरट्यांनी दगडाने घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेदाडे कुटुंबीयांना एका खोलीत कोंडून घरातील कपाट व पेट्यांमधून रोख रक्कम तसेच महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडून पलायन केले. परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन बेदाडे कुटुंबीयांना उपचारासाठी मनमाड येथील डॉ. अजय भन्साळी यांच्या रुग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)


मनमाड शहर पोलिसात काशीनाथ बेदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Dacoity in Ek Shivi Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.