वाहन उचलणाऱ्यांची अशीही ‘दबंगगिरी’
By Admin | Updated: July 26, 2016 00:19 IST2016-07-26T00:19:28+5:302016-07-26T00:19:40+5:30
दुचाकी सोडून चक्क बसप्रवाशालाच बुकलले

वाहन उचलणाऱ्यांची अशीही ‘दबंगगिरी’
नाशिक : शहर वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्याचा ठेका दिलेल्या खासगी मक्तेदारांच्या कर्मचाऱ्यांची दिवसेंदिवस मुजोरगिरी वाढतच चालली आहे.
सोमवारी (दि.२५) तर त्याचा कळसच झाला. दुचाकी उचलण्याचे सोडून वाहतूक शाखेच्या टेम्पोत कार्यरत एका कर्मचाऱ्याने चक्क बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशालाच मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बाराच्या सुमारास महापालिकेच्या राजीव गांधी भवन समोरील सुयोजित ट्रेड सेंटर आणि संकुलाच्या बाहेरील दुचाकी उचलण्यासाठी वाहतूक शाखेच्या टेम्पोमधील कर्मचाऱ्याने राजीव गांधी भवन जवळील सिग्नलजवळ उभ्या असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या बसमध्ये बसलेल्या एका युवकाला बसमधून खाली खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली. क्षणभर कोणाच्याच हा प्रकार लक्षात आला नाही.
आकाशी रंगाचे टी शर्ट घातलेल्या या वाहतूक शाखेने दुचाकी उचलण्याचे कंत्राट दिलेल्या मक्तेदाराकडे कार्यरत या कर्मचाऱ्याने नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्याचे सोडून बसमधील प्रवाशाला का ‘लक्ष्य’ केले, हे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यानंतर सिग्नलवर दबंगगिरी स्टाईलने मारहाण करणाऱ्या या कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांनी व नागरिकांनी अडविल्यावर संबंधित युवकाची सुटका झाली. शहर वाहतूक शाखेतर्फे दुचाकी व चारचाकी उचलण्यासाठी दिलेल्या कंत्राटदाराबाबत जुने नाशिक परिसरात आधीच ‘भाईगिरीची’ वदंता असल्याने मक्तेदाराने ठेवलेले कर्मचारीही दुचाकी उचलताना सर्वसामान्य नाशिककरांवर दमदाटी करीत असल्याच्या अनेक तक्रारींची चर्चा आहे. आता चक्क बसमधील प्रवाशांना मारहाण करण्याइतपत या दुचाकी उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची दबंगगिरी वाढल्याने त्यास पोलिसांनी आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)