तौक्ते चक्रीवादळाने ८१२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST2021-05-20T04:16:15+5:302021-05-20T04:16:15+5:30

नाशिक : अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात ...

Cyclone Taukte damaged an area of 812 hectares | तौक्ते चक्रीवादळाने ८१२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

तौक्ते चक्रीवादळाने ८१२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान

नाशिक : अरबी समु्द्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ८१२ हेक्टवरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. सलग तीन दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार वादळवाऱ्यामुळे आदिवासी पट्ट्यातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा अधिक फटका बसला आहे.

गुजरातच्या सीमारेषेजवळील तसेच घाटमाथ्यावरील तालुक्यांमधील गावांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार या तालुक्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील जाहीर करण्यात आला होता. रविवार दि. १६ ते बुधवार दि. १८ या तीन दिवसांच्या कालावधीत सुरगाणा, पेठ तालुक्यातील गावांना मोठा फटका बसला. सुरगाण्यात २५४१ तर पेठमध्ये १४१८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सुमारे ८१२ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये आंबा, डाळींब, पेरू या पिकांचा समावेश आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे जोरदार वाहणारे वारे तसेच पावसाचे सावट जिल्ह्यावर असले तरी सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्रर या तालुक्यांमधील पिकांना फटका बसला. या तालुक्यांमध्ये ७९८ हेक्टरवरील आंबा पिकाचे नुकसान झाले तर काही प्रमाणात डाळींब आणि पेरूची बागही उद्ध्वस्त झाली. ११ हेक्टरवरील भाजीपाला नुकसानीची अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असले तरी वादळामुळे पंचनामे करण्यास काही प्रमाणात अडचणही निर्माण झाली होती. सातत्याने होणारा पाऊस तसेच वादळामुळे येणाऱ्या अडचणींनंतरही नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या नुकसानीत रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळाने सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले. बुधवारी दुपारनंतर झालेल्या पावसानेदेखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Cyclone Taukte damaged an area of 812 hectares