नाशकात लवकरच सायबर पोलीस ठाणे
By Admin | Updated: March 31, 2017 00:49 IST2017-03-31T00:49:41+5:302017-03-31T00:49:52+5:30
नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे.

नाशकात लवकरच सायबर पोलीस ठाणे
नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यादृष्टीने मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वतंत्र सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरू करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली.
सिनिअर जर्नलिस्ट फोरमसोबत पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत शहरातील कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सिग्नल यंत्रणा, गुन्ह्यांची उकल आदि मुद्द्यांवर सिंगल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मुंबई, पाठोपाठ नाशिकमध्येही आर्थिक फसवणूक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून विविध प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हे अधिकाधिक उघडकीस आणण्याच्या उद्देशाने स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सिंगल म्हणाले. दरम्यान, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त जयंत बजबळे यांनी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम, मोहिमांची माहिती दिली. चर्चेमधून वाहतुकीच्या विविध समस्यांवर उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या. हेल्मेट वापरासंबंधीच्या जनजागृतीमुळे शहरातील निम्म्याहून अधिक लोक हेल्मेटचा वापर करत असल्याचे सिंगल म्हणाले. महिला विशेषत: महाविद्यालयीन तरुणींकडून मात्र विविध कारणे सांगून हेल्मेटचा वापर टाळला जात असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. सिंगल यांनी ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून याबाबत महिला वाहतूक पोलिसांना विशेष सूचना देऊन नाकाबंदी दरम्यान तरुणींचे हेल्मेट वापरासंबंधी समुपदेशन करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.