ग्राहकांचाही सोनेखरेदीचा उत्साह
By Admin | Updated: October 23, 2015 00:30 IST2015-10-23T00:30:36+5:302015-10-23T00:30:36+5:30
ग्राहकांचाही सोनेखरेदीचा उत्साह

ग्राहकांचाही सोनेखरेदीचा उत्साह
नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा तथा विजयादशमीचा मुहूर्त साधत नागरिकांनी आज खऱ्याखुऱ्या सोन्याचीच लूट केली. ग्रॅममागे दोनशे रुपयांनी उतरलेल्या दरामुळे ग्राहकांचाही सोनेखरेदीचा उत्साह द्विगुणित झाला. याशिवाय गृह, वाहन, इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेतही आज दसऱ्याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली. हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेला दसरा तथा विजयादशमी हा खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. विशेषत: या दिवशी सोन्याच्या खरेदीला विशेष महत्त्व आहे. दोन दिवसांपूर्वी २७ हजार ५०० रुपये प्रतिगॅ्रमवर असलेले सोन्याचे दर काल सायंकाळी मात्र तीनशे रुपयांनी घसरले. आज दिवसभर २७ हजार २०० रुपये प्रतिग्रॅम असा सोन्याचा दर होता. या घसरणीमुळे ग्राहकांचा उत्साह वाढला. दुपारी २ वाजून १९ मिनिटांनंतर खरेदीसाठी उत्तम मुहूर्त असल्याने दुपारनंतर सराफी पेढ्या गजबजून गेल्या होत्या. सोन्याचे वेढे, नाणी या वस्तूंना विशेष मागणी होती, तर बांगड्या, पोत, सोनसाखळी या दागिन्यांनाही पसंती लाभत होती. चांदीचा दर ३७ हजार ५०० रुपये प्रतिकिलो असा होता. चांदीच्या समई, ताम्हण, निरांजनी अशा वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांची वर्दळ कायम होती. दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तामुळे गृह, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेतही सकाळपासूनच गर्दी होती. आधीच नोंदणी केलेल्या सदनिका आजच्या मुहूर्तावर हस्तांतरित करण्यात आल्या. वाहनबाजारानेही गुरुवारी ‘टॉप गिअर’ टाकला. विशेषत: दुचाकींच्या विक्रीला चांगला प्रतिसाद होता. ग्राहकांनी नोंदणी करून ठेवलेल्या दुचाकींची डिलिव्हरी शोरूममधून देण्यात आली. शहरातील प्रत्येक शोरूममधून सुमारे शंभर ते दीडशे दुचाकींची डिलिव्हरी दिल्याचा अंदाज आहे. चारचाकी वाहनांच्या बाजारातही मोठी उलाढाल झाल्याचे वितरकांनी सांगितले. (प्रतिनिधी)