बारागावपिंप्री येथे सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त
By Admin | Updated: July 12, 2014 00:25 IST2014-07-11T22:58:29+5:302014-07-12T00:25:49+5:30
बारागावपिंप्री येथे सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त

बारागावपिंप्री येथे सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त
सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथे गेल्या दीड महिन्यांपासून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. येथे गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना देण्यात आले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या घरगुती वापराचे गॅस सिलिंडर मिळत नसल्याने स्वयंपाकासाठी गृहिणींचे हाल होत आहेत. जळणासाठी परिसरातून वृक्षतोड होऊ नये म्हणून अनेक ग्रामस्थांनी घरगुती वापराचे गॅस कनेक्शन घेतले आहेत. मात्र येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारे वाहन गावात येत नाही. यामुळे पुन्हा सरपणासाठी वृक्षतोड करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. जळणासाठी सिलिंडर मिळत नसल्याने पुन्हा चुली पेटविण्याची वेळ आली आहे. रॉकेलही वेळेवर मिळत नसल्याने गृहिणी संतप्त झाल्या आहेत. यापूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एजन्सीकडून गावात वाहन पाठवून पुरवठा केला जात होता. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वाहन बंद केले आहे. सिन्नर येथे गॅस सिलिंडर घेण्यासाठी गेल्यावर तेथेही सिलिंडर मिळत नाही. याबाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
बारागावपिंप्रीसह तालुक्याच्या अनेक गावांमध्ये गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी व सिलिंडर मिळावे या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. मात्र अद्यापही त्यावर उपाययोजना झाली नसल्याने ग्राहकवर्ग संतप्त झाला आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे केली असून, त्यावर शांताराम गोराडे, भीमा उगले, दामू रोडे, अॅड. आत्माराम उगले, उद्धव उगले, बबन पोमनर, गोरक्षनाथ जाधव आदिंसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)