आठ गावांत संचारबंदी
By Admin | Updated: October 13, 2016 01:23 IST2016-10-13T01:20:35+5:302016-10-13T01:23:02+5:30
तणाव टाळण्यासाठी पोलीस सज्ज : राजकीय नेत्यांचे दौरे

आठ गावांत संचारबंदी
नाशिक : तळेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत असली तरी ग्रामीण भागात होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आठ गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातही पोलिसांनी संचलन करून नागरिकांना आश्वस्त केले.
दरम्यान, नाशिक-मुंबई बससेवेबरोबरच शहर आणि काही तालुक्यांची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. बालकांवरील अत्याचारांच्या घटना चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याबरोबरच खासदार संभाजी राजे, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण पाटील, कॉँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनीदेखील पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
मंगळवारी नाशिक शहराच्या सातपूर, गरवारे पॉइंट आणि अशा अनेक ठिंकाणी दगडफेकीचे प्रकार घडले होते. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड येथील एका नगरसेवकाला भावना भडकावण्याच्या प्रयत्नांवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर जेलरोड भागात तणाव झाला होता. मात्र तोही निवळला. सातपूर भागात दुपारपर्यंत संचारबंदीसदृश स्थिती होती. नंतर तेथेही जनजीवन सुरळीत झाले. मंगळवारी सिडकोत लेखानगर भागात एका नगरसेवकाच्या मोटारीवर दगडफेक करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली. भगूर येथे एका धार्मिक कार्यक्रमाचा फलक फाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघड झाल्यानंतर भगूर बंद पाळण्यात आला. दुपारी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी विविध समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि शांततेसाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले. तर दुपारी शहराच्या विविध भागातून पोलिसांनी संचलन केले. दरम्यान,शहरातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)