नारळाच्या झाडांची लागवड
By Admin | Updated: July 3, 2015 00:24 IST2015-07-03T00:22:45+5:302015-07-03T00:24:04+5:30
बहरला गोदाकाठ

नारळाच्या झाडांची लागवड
नाशिक : गोदावरी नदी हे शहराचे वैभव. या नदीच्या काठावर दर बारा वर्षांनी कुंभ पर्वणी पार पडते. नाशिकचा कुंभमेळा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. यानिमित्त गोदावरीची स्वच्छता व नदीकाठाचे सौंदर्य वाढीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय, सामाजिक स्तरावर प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रामवाडी पूल ते अहल्यादेवी होळकर पुलापर्यंत नारळाच्या ४० वृक्षांची लागवड जयंम फाउंडेशनच्या वतीने आज (दि.२) करण्यात आल्याने गोदाकाठाचे रूपडे पालटले आहे. जणू कोकणातल्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आनंद संध्याकाळी गोदापार्कवर नाशिककर लुटत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन गोदापार्क विकसित केला जात असून, त्याला आगळेवेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापौर अशोक मुर्तडक यांनी पालिकेच्या माध्यमातून रामवाडी पूल ते अहल्यादेवी पुलापर्यंतचा गोदापार्क परिसर संपूर्ण स्वच्छ करून त्या ठिकाणी वृक्षारोपणाची संकल्पना जयंम फ ाउडेशनच्या पदाधिकाऱ्यांपुढे मांडली होती. फाउंडेशनचे मनोज टिब्रिवाला, अॅड. शमा सांगवी, डॉ. सारंग इंगळे, डॉ. आश्विनकुमार भारद्वाज आदिंनी या गोदापार्क परिसराला भेट देऊन पाहणी केली होती. त्यादरम्यान, गोदाकाठालगत नदीपात्रापासून सुमारे पाच फूट अंतरावर वर्तुळाकार पद्धतीने नारळाची वृक्षलागवड केल्यास या भागातील गोदावरीचा किनारा अतिशय सुंदर होईल, असा विचार पदाधिकाऱ्यांच्या मनात आला. या विचाराला कृतीचे स्वरूप आज देण्यात आले. नारळाचे ४० वृक्ष गोदाकिनारी लावण्यात आले असून, लवकरच अजून ११ वृक्षांची येथे लागवड करण्यात येणार आहेत. एकूण नारळाची ५१ वृक्ष लावण्याचा संस्थेचा मानस आहे. गोदाकाठ जणू समुद्रकिनाऱ्याप्रमाणे भासत असून, नाशिककरांनी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी गर्दी केली होती.