सिडकोत सर्वच केंद्रांवर नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:02+5:302021-07-04T04:11:02+5:30
सिडको व अंबड भागात गेल्या तीन दिवसांपासून लसीचा डोस उपलब्ध नव्हता. नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रावर उद्घाटनासाठी थोड्याफार प्रमाणात ...

सिडकोत सर्वच केंद्रांवर नागरिकांची गर्दी
सिडको व अंबड भागात गेल्या तीन दिवसांपासून लसीचा डोस उपलब्ध नव्हता. नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रावर उद्घाटनासाठी थोड्याफार प्रमाणात लसींचा डोस उपलब्ध होता. शनिवारी सिडकोतील सर्वच केंद्रांवर लस उपलब्ध झाल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यामुळे काही केंद्रांवर गोंधळ उडाला. महापालिकेच्या वतीने सिडको भागात मोरवाडी, हेडगेवार चौक, अचानक चौक, अंबड गोविंदनगर, भुजबळ फार्म, महालक्ष्मी चौक, गणेश चौक, मटालेनगर यासह अनेक ठिकाणी लस देण्यासाठी केंद्र सुरू केले आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सिडको भागातील सर्वच केंद्रांवर लसींचा साठा उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागले होते. शनिवारी सिडको व अंबड भागातील बहुतांशी सर्वच केंद्रांवर लसीचा डोस उपलब्ध झाल्याने सर्वच केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. लस घेण्यासाठी आलेले नागरिक व लसींचा साठा यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली. यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.