कुशावर्तावर स्नानासाठी महिलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 18:23 IST2019-09-03T18:23:11+5:302019-09-03T18:23:42+5:30
ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी कुशावर्त तीर्थावर महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.

कुशावर्तावर स्नानासाठी महिलांची गर्दी
त्र्यंबकेश्वर : ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी कुशावर्त तीर्थावर महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले.
भाद्रपद शु. ५ ऋ षिपंचमीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे विशेषत: धुळे, जळगाव, साक्री, पिंपळनेर, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नाशिक, पिंपळगाव बसवंत, येवला, नांदगाव, इगतपुरी, सिन्नर, पेठ सुरगाणा येथील महिला उपस्थित होत्या. कुशावर्त तीर्थ, अहिल्या गोदावरी संगम घाट, प्रयाग तीर्थ आदी ठिकाणी महिलावर्गाने स्नानासाठी गर्दी केली होती. प्रत्येकीने आपल्याबरोबर वनस्पती आघाडा, दुर्वा आदी शंकराला भक्तिभावाने वाहिले. पती-पत्नी या दोघांनाही दीर्घायुष्य लाभावे या भगवान शंकर भक्तीचा महिमा आहे, असे त्र्यंबकेश्वर येथील बाळासाहेब दीक्षित यांनी सांगितले. ते म्हणाले, वास्तविक यात भगवान शिवाची वाळूची मूर्तीदेखील केली जाते. नदीकाठी वाहत्या पाण्यात अंघोळ करणे हा खरा विधी आहे. तसेच कुशावर्त तीर्थ हे तीर्थराज कुशावर्त तीर्थ असल्याने त्यात गोदामायीचा प्रवाह असल्याने स्नान करण्यास कुशावर्ताचा वापर करणे सर्वथा योग्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला महिलावर्गाने प्रचंड गर्दी केली होती. कुशावर्तावर स्नान करून त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनविधी आटोपून महिलावर्गाने प्रसाद खरेदी करून बस स्थानकावर गर्दी केली होती.