‘मामको’त इच्छुकांच्या समर्थकांची गर्दी
By Admin | Updated: October 6, 2015 22:16 IST2015-10-06T22:14:41+5:302015-10-06T22:16:51+5:30
‘मामको’त इच्छुकांच्या समर्थकांची गर्दी

‘मामको’त इच्छुकांच्या समर्थकांची गर्दी
संगमेश्वर : निवडणूक अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी असल्याने इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या गर्दीमुळे मंगळवारी मालेगाव मर्चंट्स को-आॅप. बँकेच्या मुख्य कार्यालयाला जणू काही यात्रेचे स्वरूप आले होते.
मालेगाव शहराची मुख्य अर्थवाहिनी असलेल्या मालेगाव मर्चंट्स् को-आॅप. बँकेची पंचवार्षिक निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ७ आॅक्टोबरपर्यंत असल्याने इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याने किदवाई रस्त्यावरील मामको बँकेच्या मुख्य कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले होते. बँक परिसरात नागरिकांच्या गर्दीमुळे व त्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे संपूर्ण परिसर व्यापला होता. अर्थात हा भाग खूपच वर्दळीचा आहे. त्यात याची भर पडल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. मंगळवारी सकाळच्या सत्रात बँकेच्या विद्यमान संचालकांबरोबरच अनेक मान्यवरांनी अर्ज सादर केले. त्यात नगरसेवक सुनील गायकवाड, अॅड. रमेश मोरे, सुनील वडगे, नगरसेवक नरेंद्र सोनवणे, दादाजी वाघ, राहुल देवरे, जयघोष जाधव, सतीश कलंत्री आदि अनेकांचा समावेश होता. बुधवारी (दि. ७) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने इच्छुकांची यापेक्षा मोठी गर्दी होईल असा अंदाज आहे. (वार्ताहर)