नाशिकरोडला देखावे पाहण्यासाठी गर्दी
By Admin | Updated: September 23, 2015 22:56 IST2015-09-23T22:55:43+5:302015-09-23T22:56:21+5:30
नाशिकरोडला देखावे पाहण्यासाठी गर्दी

नाशिकरोडला देखावे पाहण्यासाठी गर्दी
नाशिकरोड : परिसरातील लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे-आरासचे काम पूर्ण झाले असून देखावे बघण्यासाठी भाविकांची सहपरिवार गर्दी होऊ लागली आहे. सिंहस्थ व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बहुतांश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असल्याने उत्साहावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.
सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीला अडथळा ठरेल किंवा रस्त्यावर मंडप टाकण्यास बंदी केल्याने बहुतेक मंडळांनी थोडक्यात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. तर दुष्काळजन्य परिस्थितीमुळेदेखील अनेक मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत आहे. लहान-मोठ्या मंडळानी छोट्या-मोठ्या गणरायाची मूर्ती व मंडपात डेकोरेशन साकारून आपआपल्या परिसरात विद्युत रोषणाई केली आहे.
नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा समुद्र मंथनाचा चलत देखावा, श्री बालाजी सोशल फाउंडेशनची म्युझिक लाईटिंग, ईगल स्पोर्ट्स अॅण्ड सोशल क्लबची भव्य विलोभनीय गणेश मूर्ती, नवले चाळीतील अथर्व मित्रमंडळाचा श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत देखावा, वर्धमान मित्रमंडळाचा ‘मेक इन इंडिया’ चलत देखावा, सत्कार पॉर्इंट साईमुक्ती फ्रेंड सर्कलची भव्य गणेश मूर्ती, देवळालीगाव गाडेकर मळा मातोश्री मित्रमंडळाचा स्वच्छता अभियान देखावा, जयभवानी रोड येथील महाराजा साईराज मित्र मंडळाचा मच्छिंद्रनाथांच्या जन्मावर आधारीत देखावा, गोसावीवाडी येथील स्वराज्य सांस्कृतिक मंडळाचा कुंभमेळ्यावर आधारीत देखावा आदि मंडळाचे देखावे भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
या व्यतिरिक्त कुंभमेळा व दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बहुतेक मंडळांनी छोटा मंडप उभारून गणरायाच्या छोट्या-मोठ्या मूर्तीची स्थापना करून देखावा, सजावट केली आहे. श्री गौरीचे विसर्जन झाल्यामुळे व मंगळवारी वरुणराजाने विश्रांती घेतल्याने सायंकाळनंतर देखावे बघण्यास भाविकांची गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)