परिचारिकांच्या २०० जागांसाठी एक हजार उमेदवारांची मनपात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST2021-07-27T04:16:00+5:302021-07-27T04:16:00+5:30
नाशिक : कोणी विदर्भातील नागपूर, तर कोणी वर्धा, कोणी बीड, तर कोणी जळगाव अशा राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून परिचारिकांच्या भरतीसाठी ...

परिचारिकांच्या २०० जागांसाठी एक हजार उमेदवारांची मनपात गर्दी
नाशिक : कोणी विदर्भातील नागपूर, तर कोणी वर्धा, कोणी बीड, तर कोणी जळगाव अशा राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून परिचारिकांच्या भरतीसाठी आलेल्या महिलांनी राजीव गांधी भवन गजबजून गेले. अवघ्या २०० एएनएम (परिचारिकांच्या) जागेसाठी ९४९ उमेदवार दाखल झाल्याने महापालिकेच्या मुख्यालयात निम्म्या भागात पाय ठेवायला जागा नाही, अशी अवस्था झाली होती.
गेल्या मार्च-फेब्रुवारी महिन्यात आलेली कोराेनाची दुसरी लाट भीषण होती. आता तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेने कितीही रुग्णालये बांधली तरी असली वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणे आवश्यक असल्याने तिसरी लाट येण्याची वाट न बघताच महापालिकेने तीन महिन्यांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या वतीने ४० वैद्यकीय अधिकारी, २८ एमडी डॉक्टर्स, ५० स्टाफ
नर्स, २०० एएनएम, आणि दहा तंत्रज्ञ अशी पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी
वॉक इन इंटरव्ह्यू सुरू आहेत. स्टाफ नर्सच्या ५० जांगासाठी मुलाखती
घेण्यासाठी उमेदवार बाेलवण्यात आले होते. त्यासाठीही इच्छुक
उमेदवारांनी हजेरी लावल्याने महापालिकेत प्रचंड गर्दी झाली हाेती. सोमवारी (दि.२६)देखील अशीच गर्दी झाल्याने महापालिकेचे नियोजनच कोलमडले होते.
नाशिक शहरातीलच नव्हे तर मराठवाडा आणि विदर्भातूनदेखील वेगवेगळ्या जिल्ह्यातून महिला मुलाखतीसाठी दाखल झाल्या होत्या.
अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त पॅनलद्वारे मुलाखती घेण्यात
येत असल्याने पहिल्या मजल्यावर रांगा लागल्या होत्या. तसेच अन्य ठिकाणीही
उमेदवार घुटमळत होते. सुरक्षा रक्षकांनी गर्दीचे नियोजन केले असले तरी
उमेदवारांची संख्या खूप असल्याने सुरक्षित अंतराच्या नियमांचा फज्जा
उडाला.
इन्फो...
मुलं कडेवर घेऊन रांगेत..
अनेक महिला दोन-तीन दिवसांपासून नाशिकमध्ये असून, त्या कुटुंबासह नातलग आणि अन्य परिचितांकडे उतरल्या आहेत. सोमवारी (दि.२६) अनेक महिला त्यांच्या लहान मुलांना कडेवर घेऊन रांगेत उभ्या होत्या, तर काहींनी पती तसेच अन्य नातेवाइकांना बरोबर आणून त्यांच्याकडे मुलाखतीच्या वेळी मुले दिली होती.
इन्फो...
राज्यात सर्वत्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने तयारी सुरू आहेत. मात्र, अनेक शासकीय निमशासकीय रुग्णालयात मुदत संपल्यानंतर हंगामी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे याच दरम्यान, नाशिक महापालिकेने जाहिरात देऊन ही भरती सुरू केली आहे.