मालेगावी रमजाननिमित्त बाजारपेठेत गर्दी
By Admin | Updated: July 28, 2014 00:49 IST2014-07-27T22:35:40+5:302014-07-28T00:49:08+5:30
मदत : पोलीस दलातर्फे खाद्यपदार्थांचे वाटप

मालेगावी रमजाननिमित्त बाजारपेठेत गर्दी
आझादनगर : रमजान ईदनिमित्ताने शहरातील सर्व बाजारपेठा मुस्लीमबांधवांच्या गर्दीने फुलली असून, अंतिम टप्प्यात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दीने वाहतुकीस खोळंबा होत आहे. मुस्लीमबहुल भागातील दुकाने सुमारे २० तास खुली ठेवण्यात आली आहेत.
कपडे, पादत्राणे, टोपी, रुमाल घरातील शोभेची वस्तूसह विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. ईद दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारात गर्दी उसळली आहे. कापडाच्या किमती व शिलाईच्या दरामुळे तरुणवर्ग कपडे शिवून घेण्यापेक्षा रेडिमेड कपडेच घेणे पसंत करतात. ईदसाठी लागणारे साहित्य, पदार्थ, सुकामेवा यांची किदवाईरोड व मोहंमदअलीरोड, सरदार थिएटर रस्त्यावर हातगाडी लावून दुभाजक तयार झाला आहे. यामुळे वाहनांना येण्यास मज्जाव करण्यात येते.
पोलीस दलातर्फे रमजाननिमित्त उपेक्षितांना पदार्थ वाटप
आझादनगर : मालेगाव पोलीस दलातर्फे समाजातील उपेक्षितांना रमजान ईदनिमित्त आवश्यक पदार्थांचे वाटप करण्यात आले. दुपारी १२ वाजता नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे त्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनित शहा, डॉ. रमेश चोपडे होते.
समाजात प्रत्येक मनुष्य जन्मास येतो. त्यास सर्वप्रथम हात लावणारी दायी ते मृत्यूसमयी त्यांचा पुकारा करणारा, कबर खोदणारा व दफण करणारा अशा संपूर्ण जीवनात विविध अत्यावश्यक कामे करणारा हाही एक मनुष्यच असतो; परंतु त्याकडे सर्वच समाजाकडून दुर्लक्ष केले जाते. समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्गातील सर्वच समाजातील स्त्री-पुरुषांचा मालेगाव पोलिसांकडून रेझिंगडेच्या समारोपावेळी सत्कार करण्यात आला होता. आज त्यातील मुस्लीम स्त्री-पुरुषांना ईदनिमित्ताने शिरखुर्मासाठी आवश्यक पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक माधव सवई, महेश चिमटे, पोलीस निरीक्षक मसुद खान, अजय वसावे, आदिनाथ बुधवंत, शिवाजी कुरकुटे यांच्यासह रियाज अन्सारी, सलीम रिजवी, सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.