कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी

By Admin | Updated: November 25, 2015 23:24 IST2015-11-25T23:23:31+5:302015-11-25T23:24:47+5:30

महोत्सव सुरू : पहाटेपासून मंदिरांमध्ये लागल्या रांगा

The crowd for Kartik Swami's darshan | कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी

कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी

पंचवटी : शनिचौकातील श्री कार्तिक स्वामी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पहाटेपासून या महोत्सवाला विधिवत प्रारंभ करण्यात आला. कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांनी भल्या पहाटेपासूनच मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. श्री काशी नाट्टकोटाई नगर छत्रंम मॅनेजिंग ट्रस्टच्या वतीने कार्तिक स्वामी मंदिरात महोत्सवाचे आयोजन केले आहे.
बुधवारी कार्तिक पौर्णिमा सुरू झाल्याने मध्यरात्री मुख्य मंदिरात अभिषेक पूजन करण्यात आले. पहाटे पूजा अभिषेक आटोपल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनाला सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. बुधवारी पौर्णिमा व गुरुवारी कृत्तिका नक्षत्र असल्याने भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. कार्तिक स्वामी महोत्सव निमित्ताने पहाटे देवाला दूध, दही, तूप, मध, लोणी, हळद पाणी, पंचामृत तसेच विविध प्रकारच्या फळांचे रस अशा जवळपास १९ पदार्थांचा अभिषेक करण्यात आला. कार्तिक पौर्णिमेला महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात असे मानले जात असल्याने महिला भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती.
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पूर्व दरवाजाने आत सोडण्याची व बाहेर निघण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर प्रशासनातर्फे प्रसादाचे वाटप केले जात होते. तर दहा, वीस, पन्नास तसेच शंभर रुपयांच्या नोटांवर मंत्राचे शिक्के मारलेले होते, त्या नोटा घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून मंदिराकडे येणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊन पोलीस बळ तैनात करण्यात आलेले होते. यावेळी मंदिराचे चोक्कलिंगम चेट्टीयार, एम. रामनाथन, शेखर चेट्टीयार, टी. शिलावंत आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The crowd for Kartik Swami's darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.