कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची गर्दी
By Admin | Updated: November 15, 2016 02:48 IST2016-11-15T02:17:00+5:302016-11-15T02:48:27+5:30
कार्तिक महोत्सव : दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची गर्दी
पंचवटी : पंचवटीतील एकमेव मंदिर असलेल्या श्री कार्तिक स्वामी मंदिरात श्री काशी नट्टकोटाईनगर छत्रंम मॅनेजिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारपासून कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक महोत्सवनिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
रविवारी रात्री ११.१८ वाजेला कार्तिक पौर्णिमा सुरू झाल्याने व सोमवारी सायंकाळी ७.२२ पर्यंत पौर्णिमा तसेच दुपारी ४.२७ पासून मंगळवारी दुपारी १.१७ पर्यंत कार्तिक नक्षत्र असल्याने भाविकांना मंगळवारपर्यंत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. कार्तिक महोत्सवानिमित्ताने भाविकांनी सोमवारी सकाळपासून कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रविवारी रात्री मंदिरात पूजाविधीने कार्यक्र माला सुरुवात करण्यात आली. देवाला स्नान, अभिषेक पूजन करून साजशृंगार करत नारळपाणी, दूध, दही, तीळ, पंचामृत आदिंसह विविध फळांच्या रसांचा अभिषेक करण्यात आला. तीन तास अभिषेक पूजन केल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले.
कार्तिक स्वामींचे वाहन मोर पक्षी असल्याने या दिवशी देवाला मोरपीस व नारळ चढविण्याची प्रथा असल्याने भाविक विशेषत: महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणात मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली होती. (वार्ताहर)