येवला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिके संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:19+5:302021-08-15T04:17:19+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून उष्णतेत देखील मोठ्या ...

येवला तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने पिके संकटात
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असून उष्णतेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वाढत्या उष्म्यामुळे खरीप हंगामातील मका,सोयाबीन,बाजरीची पिके सुकून जात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असल्याचे दिसून आले आहे.
यंदा हवामान खात्याने दिलेल्या पावसाचा अंदाज फोल ठरत असून येवला तालुक्यातील मानोरी परिसरात जुलै महिन्याच्या पंधरवड्यात अल्पशा पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत; मात्र महिना उलटूनही पाऊस गायब असल्याने वाढत्या उष्णतेने पिके कोमेजू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे. विहिरीत असलेल्या अल्पशा पाण्यावर स्प्रिंकलर आणि रेन पाईपद्वारे शक्य होईल तेवढे पाणी पिकांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून पिकांना जेमतेम चार ते पाच दिवस दिलासा मिळणार असून अशीच उष्णता कायम राहिल्यास खरीप हंगामातील लागवड केलेल्या हजारो हेक्टरवरील पेरण्या पावसाअभावी धोक्यात येणार असल्याचे वास्तववादी दृश्य येवला तालुक्यात निर्माण झाले आहे.
------------------------
पिके दर्जेदार येणार नसल्याने धास्ती
यंदा दमदार पाऊस नसल्याने एकीकडे पिके जगविणे शेतकऱ्यांना दुरापास्त होत चालले असून दुसरीकडे पिकांना खादी टाकण्यासाठी देखील जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तालुक्यातील बहुतांश भागात मका डोक्याइतक्या उंचीच्या झालेल्या असून मानोरी परिसरात मका गुडघ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे उशिरा झालेल्या पेरण्यांच्या पिकांना अद्यापही कुठल्याही प्रकारच्या खादी टाकल्या नसल्याने पिके दर्जेदार येणार नसल्याची धास्ती शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.
---------------------
खर्च वाया जाण्याची भीती
खरीप हंगामातील पिके दर्जेदार यावीत यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. महागडी बियाणे, खते, ट्रॅक्टरद्वारे मशागत असा विविध प्रकारच्या पेरणीसाठी खर्च केला असून अनेक शेतकऱ्यांनी कृषी दुकानदाराकडून उधारी तर काही ठिकाणी उसनवारी करुन बियाणे खरेदी केली आहे;मात्र पाऊसच पडत नसल्याने पिके कोमेजू लागली आहेत. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास महागडा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-----------------
खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने महिनाभरापासून ओढ दिली असल्याने पिके कोमेजून चालली आहेत. उन्हाची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेरण्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला असून पुढील काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
--------- ऋतिक दुघड, शेतकरी, मुखेड फाटा.
---------------
येवला तालुक्यात झालेली खरीप हंगामातील पेरणीची अंतिम आकडेवारी ( हेक्टरमध्ये ) पुढीलप्रमाणे.....
बाजरी - 6608, मका - 40557, तूर - 321, मूग - 8463, उडीद - 124, भुईमूग - 2560, सोयाबीन - 10042, कपाशी ( जिरायत ) 4023
वरीलप्रमाणे येवला तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झाली आहे.
----------------------
फोटो : मानोरी बु. येथे पावसाअभावी सुकून चाललेले मक्याचे पीक. (१४ मानोरी पिक)
140821\14nsk_23_14082021_13.jpg
१४ मानोरी पिक