करवाढप्रश्नी विरोधक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:12 IST2017-08-18T23:57:50+5:302017-08-19T00:12:40+5:30
स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत केलेल्या करवाढप्रश्नी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याचे पडसाद शनिवारी (दि. १९) होणाºया महासभेत उमटण्याची शक्यता आहे. करवाढप्रकरणी नागरिकांमधूनही विरोधाची धार तीव्र होऊ लागल्याने भाजपाने बचावात्मक भूमिका घेतली आहे. शनिवारी महासभेपूर्वी भाजपाच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

करवाढप्रश्नी विरोधक आक्रमक
नाशिक : स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टीत केलेल्या करवाढप्रश्नी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याचे पडसाद शनिवारी (दि. १९) होणाºया महासभेत उमटण्याची शक्यता आहे. करवाढप्रकरणी नागरिकांमधूनही विरोधाची धार तीव्र होऊ लागल्याने भाजपाने बचावात्मक भूमिका घेतली आहे. शनिवारी महासभेपूर्वी भाजपाच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत पाच वर्षांत तब्बल १२० टक्के करवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने बुधवारी (दि. १६) झालेल्या सभेत मंजूर केला होता. या भरीव करवाढीचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली असून, त्यातून सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले जात आहे. शनिवारी (दि. १९) महापालिकेची महासभा होणार आहे. या महासभेत सदर करवाढीचा प्रस्ताव जादा विषयात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महासभेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. १८) विरोधी पक्षांच्या गटनेत्यांकडे झालेल्या बैठकीत करवाढप्रश्नी आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यात आली. शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे यांनी या करवाढीला कडाडून विरोध करत कोणत्याही परिस्थितीत करवाढ होऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महासभेत शिवसेनेकडून सत्ताधारी भाजपाला जाब विचारला जाणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनीही करवाढीला पक्षाचा विरोध असल्याचे सांगत करवाढीचा प्रस्ताव महासभेवर आणूच नये, याबाबतचे पत्र महापौरांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले तर राष्ट्रवादीनेही सभागृहात आक्रमक भूमिका घेण्याची तयारी केली आहे.