नागरी बॅँकांपुढील संकट कायम
By Admin | Updated: November 16, 2016 22:39 IST2016-11-16T22:30:41+5:302016-11-16T22:39:34+5:30
नोटा बदलाचा परिणाम : ठेवायला नाही जागा, वाटपाला नाही नोटा

नागरी बॅँकांपुढील संकट कायम
नाशिक : केंद्र सरकारने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नागरी सहकारी बॅँकांपुढे गेल्या सात दिवसांपासून निर्माण झालेले प्रश्न आजही कायम असून, खातेदारांनी मोठ्या प्रमाणावर हजार, पाचशेच्या नोटा बॅँकात जमा केल्याने त्या ठेवायला जागा शिल्लक नाही, तर खातेदारांना त्यांच्या खात्यातून काढण्यासाठी बॅँकेकडे पैसेच शिल्लक नसल्याची बाब आज बॅँकांच्या अध्यक्षांनी प्रशासनाच्या कानावर घातली, मात्र आश्वासनापलीकडे त्यांच्या पदरी निराशाच पडली.
सरकारने चलनातून बाद केलेल्या हजार व पाचशेच्या नोटा नागरिकांना त्यांच्या बॅँक व पोस्ट खात्यात डिपॉझिट करण्याची मुभा दिल्याने राष्ट्रीयिकृत बॅँकांप्रमाणे नागरी बॅँकांमध्येही गेल्या बुधवारपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजार व पाचशे रुपयांच्या नोटा भरण्यास सुरुवात केली. एकीकडे नोटांचा भरणा तर दुसरीकडे त्या बदल्यात चलनातील नोटा घेण्यासाठी खातेदारांनी गर्दी केली. परंतु नागरी बॅँकांच्या चेस्ट बॅँकांनी गेल्या सात दिवसांत नागरी बॅँकांना त्यांच्या मागणीप्रमाणे चलनाचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरी बॅँकांवर ग्राहकांचा दबाव वाढत चालला असून, दुसरीकडे नागरी बॅँकांच्या भरण्यामध्ये प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांचा स्वीकार करण्यास स्टेट बॅँकेनेही नकार दिला आहे. अशा प्रकारे दुहेरी चरख्यात सापडलेल्या जिल्ह्यातील नागरी बॅँकांच्या अध्यक्षांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालय गाठले.
जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांना नागरी बॅँक असोसिएशनने निवेदन सादर केले. त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले व या संदर्भात अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याशी चर्चा करण्याची सूचना केली. बगाटे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्टेट बॅँक तसेच रिझर्व्ह बॅँकेच्या मुंबईच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या निदर्शनास नागरी बॅँकांची उपरोक्त अडचण लक्षात आणून दिल्यावर त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील नागरी बॅँकांकडे जमा झालेले डिपॉझिट व त्यांच्याकडे होत असलेली मागणी याची माहिती सायंकाळपर्यंत स्टेट बॅँकेकडे ई-मेलद्वारे जमा करण्याची सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत नागरी बॅँकेचे भास्करराव कोठावदे, विश्वास ठाकूर, माधवराव पाटील, रंजन ठाकरे, अजय ब्रह्मेचा, दत्ता गायकवाड, रामलाला सानप, शशीताई अहिरे, नाना सोनवणे, भालचंद्र कोठावदे, पंकज पारख, अशोक व्यवहारे, अशोक झंवर, मिर्झा बेग, शांताराम काटकर आदिंनी भाग घेतला. (प्रतिनिधी)