पीककर्ज वाटप बंदमुळे संकट
By Admin | Updated: September 8, 2016 01:15 IST2016-09-08T01:14:39+5:302016-09-08T01:15:34+5:30
शेतकऱ्यांपुढे प्रश्न : व्याजाने पैसे घेऊन करावी लागतात शेतीची कामे

पीककर्ज वाटप बंदमुळे संकट
सिद्धपिंप्री : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने पीककर्ज वाटप बंद केले असून त्यामुळे परिसरातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना व्याजाने खासगी व्यक्तींकडून पैसे आणून खर्च करावा लागत आहे.
जिल्हा बॅँकेकडून कर्जाऊ रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे सोसायटीकडे अर्ज दिले; मात्र जिल्हा बॅँकेने थेट पीककर्ज बंद केल्याचे स्पष्ट केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सप्टेंबर अखेरीस किंवा आॅक्टोबरमध्ये द्राक्ष छाटणी सुरू होणार आहे. यावर्षी भाजीपाल्याला पुरेसा भाव नसल्याने शेतकरी आता द्राक्षावर अवलंबून आहेत, अशा वेळी शेतकऱ्यांना आता पीककर्ज न मिळाल्यास उद्ध्वस्त होण्याची वेळ येणार आहे.
गेल्या जिल्हा बॅँकेकडून कर्ज वाटप बंद असून शेतकऱ्यांंनी विनवणी करूनही पीककर्जाचे वाटप सुरू केलेले नाही.
त्यामुळे आठ दिवसांत पीककर्ज वाटप न केल्यास जिल्हा बॅँकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब ढिकले, जिल्हा परिषद सदस्य अलकाताई साळुंखे, नाशिक तालुक्याच्या पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शंकरराव ढिकले तसेच नामदेव ढिकले, यशवंत ढिकले, उपसरपंच सुला पवार, भाऊसाहेब ढिकले, उत्तमराव राजोळे, राजेंद्र जाधव, प्रकाश ढिकले, बाळासाहेब उखार्डे, नवनाथ ढिकले, अंबादास ढिकले, रमेश कुमावत, बाळासाहबे ढिकले यांनी एका निवेदनाद्वारे दिले आहे. (प्रतिनिधी)