अन्यायग्रस्तांनी घेतली ‘मॅट’मध्ये धाव

By Admin | Updated: July 23, 2016 01:36 IST2016-07-23T01:33:56+5:302016-07-23T01:36:21+5:30

पोलीसपाटील भरती : फेरमुलाखतीसाठी साकडे

Criminals took the 'matte' | अन्यायग्रस्तांनी घेतली ‘मॅट’मध्ये धाव

अन्यायग्रस्तांनी घेतली ‘मॅट’मध्ये धाव

 नाशिक : सिन्नर, निफाड तालुक्यांत पोलीसपाटील भरतीत स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याचे पाहून अन्याय झालेल्या उमेदवारांनी थेट ‘मॅट’मध्ये धाव घेऊन दाद मागितली असून, तसा अर्ज दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे प्रांत अधिकाऱ्याने शिफारस केल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनीच फेर तोंडी मुलाखत घ्यावी यासाठी निवेदन देऊन साकडे घालण्यात आले आहे.
पोलीसपाटील भरतीत शैक्षणिक पात्र असतानाही गुणदानात डावलल्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी गुणदानाची पद्धती ठरवून दिलेले असतानाही ती डावलण्यात आल्याचेही या चौकशीत स्पष्ट झाल्याने ज्या उमेदवारांवर अन्याय झाला त्यांची फेर तोंडी मुलाखत घेण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निफाड प्रांत अधिकाऱ्याला दिले होते. मुळात ज्यांनी गुणदानात डावलले त्यांनाच पुन्हा फेर मुलाखतीसाठी आदेशीत
केल्यामुळे अन्यायग्रस्तांना न्याय मिळणारच नाही हे स्पष्ट दिसत असताना, प्रत्यक्ष तसेच झाले. निफाड प्रांत अधिकाऱ्याने तक्रारदार सहा उमेदवारांना केलेले गुणदान कसे योग्य होते याचा खुलासा करतानाच, जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या गुणदानाचा तक्ताच मिळाला नसल्याचा दावा केला. या साऱ्या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर न्याय मिळणार नसल्याचे पाहून तीन उमेदवारांनी थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावले आहेत.
दरम्यान, निफाड प्रांत अधिकाऱ्याने केलेल्या शिफारशीप्रमाणे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच फेर मुलाखती घ्याव्यात, अशी मागणी अन्यायग्रस्त उमेदवारांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, प्रांत अधिकाऱ्याने जो अहवाल दिला आहे तो पूर्णत: चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. त्यांनी एकाही उमेदवाराच्या कोणत्याही प्रकारची मूळ शैक्षणिक व अनुषंगिक कागदपत्रे तपासलेले नसून, ती कागदपत्रे कार्यालयातील लिपिकाने तपासली आहेत, त्यामुळे सदरचा अहवाल आम्हाला मान्य नसल्याने फेर मुलाखती घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर मीना दराडे, केशव बिन्नर, रवींद्र हांडोरे, नवनाथ बोडके, संदीप घुले, मोहन बोडके, राजू बिन्नर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Criminals took the 'matte'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.