गुन्हेगारांना जातच नसते
By Admin | Updated: September 5, 2016 01:27 IST2016-09-05T01:06:47+5:302016-09-05T01:27:04+5:30
नागराज मंजुळे : बाबासाहेब विचार संमेलन उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

गुन्हेगारांना जातच नसते
नाशिक : कोणत्याही गुन्हेगारी कृत्यामागे केवळ त्या व्यक्तीची गुन्हेगारी प्रवृत्ती असते, त्याचा कोणत्याही जातीशी संबंध नसल्याचे सांगत कोपर्डी येथील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींनाही कोणतीही जात नसून ते गुन्हेगाराच असल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
रावसाहेब सभागृहात बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर श्रीपाद जोशी, नागपूर संमेलनाध्यक्ष रावसाहेब कसबे, संमेलनाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, स्वागताध्यक्ष मनीषा जगताप, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माजी नगरसेवक हेमलता पाटील आदि उपस्थित होते. यावेळी मंजुळे यांनी समाजातील विकृत प्रवृत्तींवर भाष्य करताना फटकेबाजी केली. ते म्हणाले, विविध ठिकाणी असलेले महापुरुषांचे पुतळे, स्मारक यांच्या विटंबनेच्या कारणामुळे आंदोलन करणाऱ्या अनेकांना प्रत्यक्ष वस्तुस्थितीविषयी माहिती नसल्याचे समोर येते.
त्यामुळे पुतळे, स्मारकांसाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यांनी नव्हे तर त्यांच्या पुस्तकाने समाजात परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मिरवणुका बंद कराव्यातडॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त डीजेच्या तालावर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकींमध्ये झिंगाटसारख्या गाण्यावर तरुणाई थिरकते. मात्र त्यातून महापुरुषांच्या विचारांचा प्रसार कसा होऊ शकतो. या मिरवणुकांमुळे केवळ विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, अभ्यासक आदि विविध घटकांनाच त्रास होतो. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने होणारे ध्वनिप्रदूषण हे एकप्रकारचे पॅसिव्ह स्मोकिंग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अशा मिरवणुका बंद करायला हव्यात, असे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.