दंगलप्रकरणी ३५ संशयितांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: February 25, 2017 01:22 IST2017-02-25T01:22:18+5:302017-02-25T01:22:34+5:30
हिरावाडी : नऊ संशयितांना अटक

दंगलप्रकरणी ३५ संशयितांवर गुन्हे दाखल
पंचवटी : हिरावाडीतील मीनाताई ठाकरे क्रीडासंकुलात सुरू असलेल्या मतमोजणी केंद्राबाहेर गैरकायदा मंडळी जमवून दुचाकी, चारचाकी वाहनांच्या काचा फोडून पोलिसांवर दगडफेक करून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या सुमारे ३५ संशयितांवर पंचवटी पोलिसांनी बेदम मारहाण तसेच दंगल घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पंचवटी पोलिसांनी या दंगलप्रकरणी नऊ संशयितांना अटक केली आहे़ त्यामध्ये प्रभाग एकमधील शिवसेना उमेदवार विशाल कदम (गुलमोहोरनगर), अमोल कदम, आडगावमधील सिद्धेश्वर अंडे, हेमंत अहिरराव, कुंदन वैद्य (राग़णेशवाडी), जुने नाशिकमधील शरद बोडके, भगूरमधील अक्षय कदम, दीपक देशमुख, संतोष बैरागी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत़ या संशयितांमध्ये शिवसेनेकडून उमेदवारी करणाऱ्या दोन उमेदवारांसह एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे़ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणाचा तपास पंचवटीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी करीत आहेत. (वार्ताहर)