हवालदारच्या मृत्यू प्रकरणी निरीक्षकावर गुन्हा
By Admin | Updated: October 3, 2014 00:37 IST2014-10-03T00:08:10+5:302014-10-03T00:37:55+5:30
हवालदारच्या मृत्यू प्रकरणी निरीक्षकावर गुन्हा

हवालदारच्या मृत्यू प्रकरणी निरीक्षकावर गुन्हा
नाशिक : इगतपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार विठ्ठल सखाराम जाधव यांच्या आत्महत्त्येप्रकरणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोळेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक खंडरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांची हे दोघे छळवणूक करीत होते, त्यामुळेच त्यांनी आत्महत्त्या केल्याची तक्रार जाधव यांच्या पत्नीने केली होती. त्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विठ्ठल सखाराम जाधव यांनी २८ सप्टेंबर रोजी पोलीस लाईनीतील त्यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. कौटुंबिक कलहातून जाधव यांनी आत्महत्त्या केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिली होती; परंतु त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी विठ्ठल जाधव यांच्या पत्नी छाया जाधव यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. जाधव यांचा यापूर्वी अपघात झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, तरीही त्यांना वारंवार ड्यूटी देऊन त्यांची निरीक्षक कोळेकर आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक खंडरे हे छळ करीत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्त्या केल्याचे जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)