त्र्यंबकला गर्भगृहात प्रवेश नाकारल्याप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: April 16, 2016 00:34 IST2016-04-16T00:29:40+5:302016-04-16T00:34:00+5:30

त्र्यंबकला गर्भगृहात प्रवेश नाकारल्याप्रकरणी गुन्हा

Crime in denying admission in Trimbakas Garbhathera | त्र्यंबकला गर्भगृहात प्रवेश नाकारल्याप्रकरणी गुन्हा

त्र्यंबकला गर्भगृहात प्रवेश नाकारल्याप्रकरणी गुन्हा


त्र्यंबकेश्वर : सतत दोन दिवसांपासून प्रयत्न करूनही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारून अपमानजनक वागणूक दिली व महिलांना धक्काबुक्की, मारहाण केल्याची फि र्याद स्वराज्य महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनिता गुट्टे व त्यांच्या तीन सहकारी महिलांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकणी त्र्यंबक पोलिसांनी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यास मज्जाव केल्या प्रकरणी सुमारे २०० ते २५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीत वनिता गुट्टे यांनी, दि. १३ व १४ एप्रिल या दोन दिवसांपासून मी व माझ्यासमवेत असलेल्या सुरेखा राजू थोरात, शारदा शिवकुमार भटपती, मनीषा राजाराम कुंजीर, निर्मला शंकर अडसूळ व अनिता दिगंबर मोटकर आणि इतर २० ते २५ महिला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करीत असताना आम्हाला मंदिरातील पुजारी, पुरोहित, नगरसेवक, ग्रामस्थ, मंदिराचे विश्वस्त, महिला-पुरुष आदिंनी आरडाओरड करून गर्भगृहात जाऊ दिले नाही. महिला गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही असे म्हणत या सर्व मंडळींनी आम्हाला धक्काबुक्की करून मारहाण केली. शिवीगाळ करून बळजबरीने आम्हाला मंदिराबाहेर घालविण्यात आले.आम्ही मंदिर प्रांगणात बसलो असताना प्रशासकीय अधिकारी तेथे आले व कार्यालयात चला, तेथे आम्ही ३-४ महिला गेल्यावर उद्या सकाळी (दि. १४) ६ ते ७ या वेळेत महिला-पुरुष भाविकांना मंदिरात (गर्भगृहात) प्रवेशाची वेळ असते. तुम्ही ड्रेस कोड फॉलो करून या तुम्हाला गर्भगृहात प्रवेश मिळेल, असे आम्हाला तोंडी सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही सुती साड्या परिधान करून गेलो. यावेळेस तुमच्या अंगावर ओले कपडे नाही वगैरे कारणे दाखवून प्रवेश दिला नाही. प्रत्येक पायरीवर पुरोहित होते. आम्हाला प्रवेश द्यायचा नव्हता या हेतूने केवळ वेळकाढू धोरण अवलंबून सकाळी ७ वाजेनंतर गर्भगृह प्रवेश नाही असे कारण सांगत मंदिरातील २०० ते २५० जणांनी आम्हाला मारहाण,धक्काबुक्की, शिवीगाळ करत अपमानित करून, बळजबरीने मंदिराबाहेर काढले. तिसऱ्यांदा पोलिसांना बरोबर घेऊन केवळ दोन ते तीन महिला जाऊनही तीच पुनरावृत्ती झाली. पण गर्भगृहात प्रवेश मिळू दिला नाही. तथापि विरोध करणाऱ्यांचे नाव, गाव माहीत नसल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी त्र्यंबक पोलिसांनी महाराष्ट्र हिंदू सार्वजनिक प्रार्थनास्थळे प्रवेश मान्यता अधिनियम १९५६चे कलम ४(अ) १(अ) ५ प्रमाणे २०० ते २५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे देवस्थानच्या नियमांचा भंग केला. आरडाओरड केली व मंदिरात शिवीगाळ केल्याचा तक्रार अर्ज त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याचे समजते.
हॉटेलमालकाने चहा दिला नाही
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील हॉटेलात चहा पिण्यासाठी गेलो असताना हॉटेलमालक व त्यांच्या नोकरांनी आम्हाला चहा देण्यासही नकार दिला, असे या महिलांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे.
(वार्ताहर)

Web Title: Crime in denying admission in Trimbakas Garbhathera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.