शिष्य आत्महत्त्येप्रकरणी सहा साधूंविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 29, 2016 00:13 IST2016-07-28T23:59:18+5:302016-07-29T00:13:51+5:30
आडगाव पोलीस ठाणे : तपोवनात गेल्यावर्षी घडली होती घटना

शिष्य आत्महत्त्येप्रकरणी सहा साधूंविरुद्ध गुन्हा
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला तपोवनात आलेल्या साधूंकडे शिष्य म्हणून असलेल्या बजरंगीदास दुर्गाप्रसाद केसरी या २० वर्षीय युवकाला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील सहा साधूंविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत ८ सप्टेंबर रोजी तपोवनात (साधुग्राम) ही घटना घडली होती.
या घटनेबाबत उत्तर प्रदेशात राहणाऱ्या मयत बजरंगीदास केसरी याचे वडील दुर्गाप्रसाद केसरी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बजरंगीदास केसरी हा वीस वर्षीय युवक साधूंचा शिष्य म्हणून नाशिकला तपोवनात साधुग्राम येथे कुंभमेळ्याच्या कालावधीत आला होता. ८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री त्याला पोटाचा त्रास होऊन उलट्या होऊ लागल्याने इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. मयताचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याने विषप्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते.
सदर घटनेला १० महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर मयताच्या कुटुंबीयांनी आडगाव पोलिसांत धाव घेत कुंभमेळा कालावधीत बजरंगीदास याने साधूंकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्त्या केली असल्याची तक्रार केली. त्यानुसार रामकमलदास, विष्णूदास, बलिरामदास, सुमेरी यादव, पन्नासिंग, सफाईदास गुरू ब्रह्मानंद तिवारी सर्व राहणार मरूही, मिरजपूर, उत्तर प्रदेश यांच्याविरुद्ध आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)