नाशिक : मिशन महापालिकेसाठी दाखल झालेल्या राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले फलक महापालिका आणि पोलीस यंत्रणेकडून बुधवारी (दि. २२) हटविण्यात येत असताना आक्षेप घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दत्तू दातीर, सचिन सिन्हा, मिलिंद कांबळे, विजय अहिरे, अतुल पाटील व शाम गोहाड यांच्यासह दोन ते तीन कार्यकर्त्यांनी संगनमत करून अनधिकृत बॅनर काढण्याच्या कारवाईस आक्षेप घेतला. तसेच जोरजोरात घोषणाबाजी केली. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये बसून सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणला. तसेच गर्दी जमवून कोरोना फिजिकल डिस्टन्स नियमांचेही व शासनाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक के. टी. रौंदळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.