दिवाळखोरीमुळे पतसंस्था बुडतात
By Admin | Updated: September 26, 2016 01:53 IST2016-09-26T01:53:24+5:302016-09-26T01:53:58+5:30
थोरात : जिल्हा टीचर्स पतसंस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन

दिवाळखोरीमुळे पतसंस्था बुडतात
नाशिक : महाराष्ट्राची प्रगती व समृद्धीमध्ये सहकारक्षेत्राचा मोठा वाटा असून, ही चळवळदेखील महाराष्ट्रातूनच सुरू झाली़ सहकार क्षेत्राचा पाया हा कार्यकर्ता असून, त्यांच्यामुळेच या क्षेत्राने चळवळीचा रूप घेतले व यशस्वीही झाली़ मात्र, या क्षेत्रातही आर्थिक दिवाळखोरीने शिरकाव केल्याने राज्यभरातील बहुतांश नामांकित पतसंस्था बुडाल्या आहेत़ अशा विदारक परिस्थितीत रौप्यमहोत्सव साजरा करणारी पतसंस्था असेल तर तिच्या कारभार व कारभाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले़
हनुमानवाडीतील भावबंधन मंगल कार्यालयात नाशिक जिल्हा कॉलेज टीचर्स सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात थोरात बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रासाठी सध्याची परिस्थिती ही आव्हानात्मक बनली आहे़ राज्यातील बहुतांशी नामांकित पतसंस्था या आर्थिक दिवाळखोरीत निघत असताना या संस्थेने रौप्यमहोत्सव साजरा करणे ही खरोखर अभिमानाची बाब आहे़ विद्यार्थी व संस्था यांच्या भवितव्यासाठी एकत्रितपणे चर्चा केली पाहिजे़
शिक्षणक्षेत्रातील समस्या या मोठ्या असून, त्यांच्यासमोर रिक्त जागांचा प्रश्न आहे़ या समस्या सोडविण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही थोरात यांनी सांगितले़ पतसंस्थेचे अध्यक्ष दौलत शिंदे यांनी पतसंस्थेच्या प्रगतीबाबत माहिती दिली़ यावेळी आमदार देवयानी फरांदे, प्राचार्य विष्णू रसाळ, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अॅड़ नितीन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष व माजी खासदार प्रतापदादा सोनवणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते़
मान्यवरांच्या हस्ते पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर डॉ. सुनील ढिकले, नाना महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पाटील पानगव्हाणे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष माणिकराव वानगे, अशोक बाजारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)