नाशिक : कोरोनाच्या काळात घरातच अडकून पडलेल्या मुलांची मानसिकता सांभाळणे, त्यांना आपल्या कामात सहभागी करून घ्यावे, छोट्या कामातून त्यांना श्रवण आणि निरीक्षणाची संधी द्यावी, मशीनव्दारे होणारी छोटी-छोटी कामे मुलांना करण्यास प्रोत्साहन द्या, मुलांना रोज गोष्टी सांगा, त्यांना काम करण्याची संधी द्या. चित्रे, कला, संगीत, क्लेवर्क यासारख्या नवनवीन कलांचा आनंद घेऊ देणे आवश्यक असल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले.
‘कोरोनाकाळात पालकांची मुलांची मानसिकता सांभाळावी’, हा परिसंवादाचा विषय होता. सावानाच्या ‘शब्द जागर भेटूया घरोघरी’ या व्याख्यानमालेत ‘ऑनलाइन शाळा आला कंटाळा’ या परिसंवादात ते बोलत होते. कोरोनाकाळातील भावविश्व जोशी यांनी उलगडले. सविता कुशारे यांनीही या परिसंवादात सहभाग घेतला. त्या म्हणाल्या, शाळेचा लळा काही आगळाच असतो. शाळेशी निगडित वस्तूंशीही मुलांची मैत्री असते. वर्गातल्या खोड्या, डबा खाणे, चुळबुळ करणे, आवाज करणे हे सारे चैतन्यदायी असून ते या कोरोनाने हिरावून नेल्याने मुलांना अधिकाधिक आनंददायी वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन सुरेखा बोराडे यांनी केले. प्रास्ताविक गिरीश नातू यांनी केले. आभार प्रदर्शन गीता बागुल यांनी केले. दरम्यान रविवारी शंकरराव बर्वे मैत्र भावांजली अंतर्गत इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांचे व्याख्यान रंगणार आहे.
इन्फो
वैविध्यपूर्ण सादरीकरण
संगीता बागुल यांनी ऑनलाइन शिक्षणाच्या गमतीजमती सांगितल्या. कधी नेटवर्कची समस्या निर्माण होते आणि दृश्य स्वरूपात वेगळी चित्रे दिसतात. मुलांना ऑनलाइनचे महत्त्व कळायला हवे, असेही त्यांनी सांगितले. गिरिजा चंद्रात्रे या मुलीने ‘आला ऑनलाइन शाळेचा कंटाळा’ या आशयाची कविता सादर केली. सुवर्णा देसले यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचण्यासाठी पुस्तके सुचवली. व्हर्चुअल लायब्ररी कशी ऑपरेट करायची ते पीपीटीच्या माध्यमातून त्यांनी सांगितले. ऑनलाइन पुस्तके वाचणे आणि ऐकणे कसे करावे ते सांगितले. वाचनालयाचे महत्त्वाचे संस्कार होतात, हे प्रात्यक्षिकात दाखविले. स्नेहल काळे यांनी कोरोनाकाळात करावयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. चित्रा थोरे यांनी ‘आमचा अभ्यास आमच्या हातात, अभ्यासाची पंचतंत्रे’ हा विषय चित्रांच्या आधारे सांगून स्पष्ट केला. डॉक्टर वेदश्री थिगळे यांनी मुलांच्या मानसिकतेची कविता सादर केली.
आजचे व्याख्यान
विषय - ‘राजर्षी शाहू महाराजांचे स्त्री उद्धाराचे कार्य’
वक्ते - डॉ. मंजुश्री पवार