उड्डाणापूर्वीच कोसळले विमान; यंत्रणा ४५ मिनिटांत सज्ज
By Admin | Updated: July 16, 2017 00:04 IST2017-07-15T23:43:08+5:302017-07-16T00:04:36+5:30
आपत्ती व्यवस्थापनाची हाताळणीची रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा रन-वे वर विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच कोसळल्याची रंगीत तालीम घेण्यात आली.

उड्डाणापूर्वीच कोसळले विमान; यंत्रणा ४५ मिनिटांत सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी ओझरच्या विमानतळावरून अतिरेक्यांनी प्रवाशांनी भरलेले विमान अपहरण केल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची हाताळणीची रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा रन-वे वर विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच कोसळल्याची रंगीत तालीम घेण्यात आली. घटना घडल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत सर्व यंत्रणा सज्ज झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या ओझर विमानतळाची सुरक्षा तितकीच महत्त्वाची असून, त्या संदर्भात वेळोवेळी आढावा घेतला जात असताना त्याचाच भाग म्हणून विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पाहणाऱ्या यंत्रणांकडून रंगीत तालीम घेतली जात आहे. शनिवारी रन वे वर विमान कोसळल्याची घटना घडल्याचा निरोप सकाळी ११ वाजून पाच मिनिटांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना आला व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित झाली. विमान कोसळल्यामुळे प्रवासी जखमी झाल्याने तत्काळ रुग्णवाहिका व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, त्यानुसार दोन रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी रवाना झाले. त्याचबरोबर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. जखमींवर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या सर्व यंत्रणांनी अवघ्या ४५ मिनिटांत परिस्थिती हाताळली. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एचएएलचे विजय किंकरे हे अधिकारी स्वत:च जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात बसून होते. दुर्घटनेचा दूरध्वनी आल्यापासून ते परिस्थिती हाताळल्यापर्यंत यंत्रणांनी किती झपाट्याने प्रतिसाद दिला त्याबाबतची प्रत्येक नोंद घेण्यात आली.