शिल्पकार संदीप लोंढे सन्मानित
By Admin | Updated: February 22, 2017 02:01 IST2017-02-22T02:01:25+5:302017-02-22T02:01:42+5:30
शिल्पकार संदीप लोंढे सन्मानित

शिल्पकार संदीप लोंढे सन्मानित
नाशिक : येथील शिल्पकार संदीप लोंढे यांना पुणेस्थित तुलसी आर्ट ग्रुपच्या वतीने शिल्पकलेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०१७ चा ‘युवा शिल्पकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील बालगंधर्व कलादालन येथे शुक्रवारी (दि.१७) झालेल्या या कार्यक्रमात तुलसी आर्ट ग्रुपचे अध्यक्ष सुरेश लोणकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी विख्यात व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, मनोज सकळे, मुरली लाहोटी, प्रमोद कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. मुळ नाशिकचे असणाऱ्या संदीप लोंढे यांचे शालेय शिक्षण पेठे हायस्कूल येथे झाले असून उच्च शिक्षण मुंबईच्या सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट येथे झाले. त्यांनी अप्लाइड आर्टचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून, वास्तववादी शैलीत त्यांनी सर्वाधिक काम केले आहे. फायबर, मेटल, सिपोरेक्स आदि विविध माध्यमातून त्यांनी आजवर महाराष्ट्रासह जगभरात शिल्पकृती तयार केल्या आहेत. पुण्याच्या तुलसी आर्ट ग्रुपला २५ वर्ष पूर्ण झाली असून, युवा कलाकारांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी युवा पुरस्कार दिला जातो. निवड समितीने संदीप लोंढे यांची यांच्या वास्तववादी शैलीतील कामाची दखल घेत पुरस्कारासाठी निवड केली होती. शिल्पकलेतील लोंढे कुटुंबीयांचे काम उल्लेखनीय आहे. (प्रतिनिधी)