कोव्हॅक्सिन लस बेवारस स्थितीत रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:33+5:302021-07-04T04:11:33+5:30
एकीकडे कोरोना लसीकरणाचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे मात्र कोव्हॅक्सिनचे भरलेले तब्बल १४ व्हायल रस्त्यावर आढळून आले आहेत. गोबापूरकडून ...

कोव्हॅक्सिन लस बेवारस स्थितीत रस्त्यावर
एकीकडे कोरोना लसीकरणाचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे मात्र कोव्हॅक्सिनचे भरलेले तब्बल १४ व्हायल रस्त्यावर आढळून आले आहेत. गोबापूरकडून नांदुरीकडे जात असताना कल्पेश विजय जेठार यांना गोबापूर शिवारातील रस्त्यावर व्हायल पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांनी सर्व व्हायल गोबापूर येथील आशा सेविका यांच्याकडे देऊन त्यांनी नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जमा केल्या. त्यानंतर अधिक तपासासाठी नाशिक येथे पाठविण्यात आल्या आहेत. घडलेला हा प्रकार धक्कादायक आहे. लस घेण्यासाठी सामान्य नागरिकांची तारांबळ उडत असताना घडलेल्या प्रकाराबाबत प्रशासन काय भूमिका घेईल हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. एकीकडे लसींचा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे बेवारस स्थितीत लसीचे वायल सापडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवतो आहे. लस घेण्यासाठी प्रत्येक केंद्रांवर लोकांच्या पहाटेपासूनच रांगा लागत आहेत. त्यात अशा प्रकारे बेवारस स्थितीत लस आढळून आल्याने तर्कवितर्क लढविले जात असून, लसींचा काळाबाजार तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
इन्फो
वायल कोणी फेकल्या?
प्रत्यक्षदर्शी कल्पेश विजय जेठार यांनी याबाबत सांगितले की, एकीकडे कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे आणि दुसरीकडे कोव्हॅक्सिनचे वायल रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसत आहेत ही अतिशय गंभीर बाब असून, याची चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कोव्हॅक्सिनच्या वायल रस्त्यावर कुठून आल्या?
घडलेल्या प्रकाराला कोण जबाबदार? या कोव्हॅक्सिनच्या वायल कोणी फेकल्या? हा कोव्हॅक्सिनच्या काळाबाजारातून घडलेला प्रकार तर नाही ना, यासारखे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.