चुलत भावांचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: September 8, 2016 00:53 IST2016-09-08T00:51:05+5:302016-09-08T00:53:49+5:30
दोडी बुद्रूक : पोहणे शिकणे बेतले जिवावर; परिसरात शोककळा

चुलत भावांचा बुडून मृत्यू
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक येथे वाघ वस्तीजवळ असलेल्या नाल्यात पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या दोघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून, दोघा युवकांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोडी बुद्रूक शिवारात कोटमा (वाघ मळा) येथे नाला आहे. यावर्षी दोडी शिवारात चांगला पाऊस झाल्याने या नाल्याला पाणी आहे. डोंगरावरून वाहून येणारे पाणी या नाल्यातून वाहते. बुधवारी सकाळी वाघ मळ्यातील अमोल ऊर्फ दत्तात्रय भास्कर वाघ (१९) व तुषार अशोक वाघ हे दोघे युवक आपल्या वस्तीजवळच असणाऱ्या नाल्यात पोहायला शिकण्यासाठी गेले होते. पोहायला जाताना त्यांनी घरी आपण नाल्यात पोहायला शिकण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते.
सुमारे एक तास झाल्यानंतर मुले घरी न आल्याने भास्कर वाघ नाल्यावर गेले. संशय आल्याने वाघ यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, उपसरपंच सुदाम वाघचौरे, प्रमोद भालेराव, रोशन भालेराव, नाना शिंदे, मनोज वैद्य यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चांगले पोहायला येणारे युवक नाल्यात उतरले. सुमारे अर्धा तास शोधमोहीम राबविल्यानंतर तुषार व अमोल यांचा मृतदेह आढळून आला.
तुषार वाघ हा कल्याण येथे आयटीआयचे शिक्षण घेतो. गणपती उत्सवासाठी तो मूळ गावी दोडी येथे आला होता. तुषार व अमोल हे चुलत भाऊ असून, ते पोहायला शिकण्यासाठी नाल्यात गेले होते. दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतदेह नाल्यातून बाहेर काढल्यानंतर दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, हवालदार पी.के. अढांगळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)