दुग्ध शाळेतील कर्मचाऱ्यांना कोर्ट, कचेऱ्यांचीच कामे
By Admin | Updated: March 24, 2015 00:15 IST2015-03-24T00:11:13+5:302015-03-24T00:15:41+5:30
सयंत्रे धूळखात : दिवसभर अधिकाऱ्यांच्या गप्पा

दुग्ध शाळेतील कर्मचाऱ्यांना कोर्ट, कचेऱ्यांचीच कामे
नाशिक : १ नोव्हेंबर २०१३ पासून दुग्ध सयंत्रे बंद असल्याने येथील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांच्या हाताला जणू काही कुठलीच कामे शिल्लक उरली नाहीत. विभागातीलच काहींनी दाखल केलेल्या खटल्यांचा कोर्ट-कचेऱ्यांमध्ये पाठपुरावा करणे एवढेच काम येथील अधिकारी, तसेच कर्मचारी करीत असून, गप्पा-गोष्टींमध्ये त्यांचा दिवस भरत असल्याचे खुद्द येथील अधिकारी सांगतात.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शासकीय दूध योजना विभागात एकूण २० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, याठिकाणी दुग्ध व्यवसायाशी संबंधित कुठलेच कामकाज चालत नसल्याने येथील कर्मचारी केवळ हजेरी लावण्यासाठी कार्यालयात चक्कर मारतात. १९५० साली शासनाने लाखो रुपये खर्च करून ५० हजार लिटर क्षमतेचे दूध प्रक्रिया सयंत्रे खरेदी केली होती. मात्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी तथा खासगी कंपन्यांनी शासनाला दूध विक्री बंद केल्याने १ नोव्हेंबर २०१३ पासून ही सयंत्रे बंद केली आहेत. यामुळे या विभागातील अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना फारशी कामे शिल्लक उरली नसून, दुग्ध व्यवसायाशी काहीही संबंध नसलेली कामे त्यांना करावी लागत आहेत. शासन हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या विचाराधीन नसल्याने, जी कामे सांगितली जातील ती मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी भूमिका येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)