शिक्षणमंडळाकडून न्यायालयाचा अवमान; शिक्षकांचा आरोप
By Admin | Updated: November 7, 2015 23:47 IST2015-11-07T23:45:50+5:302015-11-07T23:47:06+5:30
शिक्षणमंडळाकडून न्यायालयाचा अवमान; शिक्षकांचा आरोप

शिक्षणमंडळाकडून न्यायालयाचा अवमान; शिक्षकांचा आरोप
नाशिक : शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असे स्पष्ट आदेश असतानादेखील महापालिका शिक्षणमंडळाने तेही आपले अधिकार नसताना माध्यमिक शाळेतील अधिकाऱ्यांना जनगणनेची कामे दिली आहेत त्यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची तक्रार माध्यमिक विभागाच्या शिक्षकांना केली आहे.
महापालिकेच्या सुमारे दहा माध्यमिक शाळा असून, त्यातील शिक्षकांना जनगणनेची कामे देण्यात आली आहे. मुळात नाशिक महापालिका शिक्षण मंडळाकडे केवळ प्राथमिक विभागाचा कार्यभार आहे. माध्यमिक विभाग हा थेट उपआयुक्तांच्या अखत्यारित आहे. प्रशासनाधिकाऱ्यांनी परस्पर माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची नावे जनगणना अधिकाऱ्यांकडे पाठविली आहेत. त्यासाठी न्यायालयाचा निर्णय आणि सध्या शिक्षकांवर असलेल्या कामाचा विचार करण्यात आलेला नाही. सध्या शिक्षकांकडे उत्तरपत्रिका तपासणी, निकाल पत्र तयार करणे, कार्डशीट भरणे आणि पालकमेळावा घेणे हे बंधनात्मक कामे असताना प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी परस्पर, अशा प्रकारच्या शिफारसी केल्याचे माध्यमिक शिक्षक टी. डी. गंपाले, डी. आर. बुनगे, एस. जे. बुनगे, एस. जे. सोनवणे, बी. बी. कुळधर, एस. एम. सोनवणे, एस. बी. देवरे. एन. टी. भामरे, एस. पी. शिरोडे यांच्यासह अन्य शिक्षकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)