देशाची वाटचाल अराजकतेकडे
By Admin | Updated: January 6, 2017 00:44 IST2017-01-06T00:44:19+5:302017-01-06T00:44:33+5:30
शरद पवार : राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

देशाची वाटचाल अराजकतेकडे
नाशिक : नोटबंदीच्या निर्णयाने शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, उद्योजक अशा समाजातील प्रत्येक घटकालाच फटका बसला आहे. हा निर्णय कोणी एकट्याने घेतला की सामूहिक होता हे समजू शकलेले नसले तरी, हा सत्तेचा अधिकार केंद्रित करण्याचा एक भाग आहे. ज्या ठिकाणी मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रित होते तेव्हा ती भ्रष्ट होत जाते व अशी सत्ता घेत असलेले निर्णयही देशाला अराजकतेकडे नेतात, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. पवार पुढे म्हणाले, देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेले आॅपरेशन योग्य असले तरी, आॅपरेशननंतर ज्या पद्धतीने रुग्णाची काळजी घ्यायला हवी तसे न झाल्यामुळे रुग्ण दगावण्याचीच भीती आहे असे सांगून, पंतप्रधान मोदी जेव्हा दूरदर्शनवरून महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे जाहीर झाले तेव्हा असे वाटले की पठाणकोट, उरी व लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ते पाकिस्तानबद्दल ठोस निर्णय घेतील, परंतु त्यावर भाष्य न करता त्यांनी देशातील ८६ टक्के चलन रद्दी झाले म्हणून जाहीर केले. हे सांगत असताना पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडण्यापूर्वी आकाशवाणीवरून देशाला संबोधित केले होते
याची आठवण करून दिली. देशातील काळा पैसा नष्ट करण्याच्या विषयावर एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा झाली होती.
सध्याचे राष्ट्रपती व तत्कालीन वित्तमंत्र्यांनी त्यावेळी ७७ हजार कोटी रुपये काळा पैसा असल्याचे सांगितले होते. आत्ताच्या राजवटीत एक लाख ८६ हजार कोटी रुपये काळा पैसा चलनात फिरतो, असे सरकारचे म्हणणे आहे व म्हणून ते चलनातून रद्द केले, असे समर्थन केले जात असेल तर त्यातील ९८ टक्के रक्कम आता बॅँकेत जमा झाल्याचे प्रसिद्ध होत असल्यामुळे देशात नेमका किती काळा पैसा आहे, असा सवालही पवार यांनी केला.