सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक राजी त्र्यंबक पालिका : सिंहस्थ कामे मार्गी लागण्याची चिन्हे
By Admin | Updated: November 15, 2014 00:32 IST2014-11-15T00:31:32+5:302014-11-15T00:32:15+5:30
सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक राजी त्र्यंबक पालिका : सिंहस्थ कामे मार्गी लागण्याची चिन्हे

सर्वसाधारण सभेसाठी नगरसेवक राजी त्र्यंबक पालिका : सिंहस्थ कामे मार्गी लागण्याची चिन्हे
नाशिक : सत्तेच्या राजकारणात सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे अडकल्याने हतबल झालेल्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या सत्ताधारी व विरोधक नगरसेवकांनी अखेर एकत्र येत सर्वसाधारण सभेत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करावयाच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्याची सहमती दर्शविली आहे. त्यासाठी शनिवारी पालिकेने सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला आहे. गेल्या महिन्यापासून जवळपास अकरा कोटी रुपये खर्चाची ४० कामे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीविना अडकून पडली होती. कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना व त्यातच शहरातच प्रामुख्याने ही कामे करावयाची असल्याने प्रशासनाची घालमेल वाढली होती. आॅक्टोबर महिन्यात बोलावलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधक असा वाद निर्माण झाल्याने कोठल्याही कामकाजाविना सभा आटोपण्यात आली. त्यानंतर सभा होते किंवा नाही याविषयी अनिश्चितता असतानाच, मेळा अधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही गटांच्या नगरसेवकांची समजूत घालून सिंहस्थ कामांना मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले. अखेर हे प्रयत्न फळास लागून शनिवार, दि. १५ रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी देणे, आलेल्या कामांच्या निविदा स्वीकारणे व शिल्लक राहिलेल्या कामांना मंजुरी देणे असे तीनच विषय ठेवण्यात आले आहेत. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर या कामांच्या निविदा व पुढची प्रक्रिया पूर्ण करून साधारणत: जानेवारीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे मार्चअखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हावीत असा विभागीय आयुक्तांचा आग्रह असल्याने त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.