नगरसेवक प्रकाश लोंढेंवर पोलिसांत गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 29, 2016 00:20 IST2016-05-28T23:07:47+5:302016-05-29T00:20:03+5:30
सरकारी कामात अडथळा आणल्याचे प्रकरण

नगरसेवक प्रकाश लोंढेंवर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक : त्र्यंबक-जव्हार रस्त्यावरील तोरंगण घाटातील दुहेरी खुनातील आरोपींना पाण्याच्या बाटल्यांमधून मद्य पुरविण्यास विरोध करणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की, तसेच शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री सातपूरच्या पीएल ग्रुपच्या कार्यालयात सराईत गुन्हेगार अर्जुन ऊर्फ वाट्या महेश आव्हाड व निखिल विलास गवळे यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली होती़ या खून प्रकरणात नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे व योगेश गांगुर्डे हे दोन आरोपी फरार असून, सनी ऊर्फ ललित विठ्ठलकर, निखिल निकुंभ, प्रिन्स सिंग यांसह संशयितांना अटक केली होती़
या सर्वांची मंगळवारी, दि. २४ रोजी न्यायालयात तारीख असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली मद्य देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी विरोध केला असता त्यास प्रकाश लोंढे यांनी विरोध केला़ तसेच पोलीस हवालदारास शिवीगाळ व दमदाटी देऊन अॅट्रॉसिटी अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप अहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)