मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भिस्त शासनाच्या इन्शुअरन्सवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:11+5:302021-05-05T04:24:11+5:30
महापालिकेने मसगा विद्यालय, सहारा कोविड सेंटर, हज हाऊस व दिलावर सभागृह येथे कोरोना केंद्रे सुरू केली आहेत. महापालिकेच्या आरोग्य ...

मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भिस्त शासनाच्या इन्शुअरन्सवरच
महापालिकेने मसगा विद्यालय, सहारा कोविड सेंटर, हज हाऊस व दिलावर सभागृह येथे कोरोना केंद्रे सुरू केली आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे कंत्राटी व कायमस्वरूपी असे २ हजार ५५९ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, यापैकी सुमारे ३०० कर्मचारी कायमस्वरूपी आहेत, तर २ हजार २५९ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर आरोग्य सेवेचा गाडा हाकलला जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३ महिने व ६ महिन्यांचे नियुक्तीपत्र दिले जात आहे, तर राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील कर्मचाऱ्यांना केवळ ११ महिन्यांसाठी नियुक्तीपत्र दिले जात आहे. या काळात या कर्मचाऱ्यांचे बरेवाईट झाल्यास याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडून घेतली जात नाही. शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या इन्शुअरन्सच्या परिपत्रकानुसारच लाभ दिला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. आतापर्यंत सुमारे ७० कर्मचारी कोरोनाने बाधित झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाइकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात जिवाची बाजी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्यावे यासाठी येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्या मागणीची दखल घेतली जात नाही. गेल्या २ वर्षांपासून महापालिकेत कर्मचारी सेवा देत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
कोट....
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी काळजी घेतली जात आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार इन्शुअरन्सचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. दुर्दैवाने आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवा देताना मृत्यू झाल्यास त्यांना शासनाच्या नियमानुसार लाभ दिला जाईल.
- भालचंद्र गोसावी, मनपा आयुक्त, मालेगाव.
कोट....
गेल्या दीड वर्षापासून आरोग्य विभागात सेवा देत आहे. जीव धोक्यात घालून काम केले जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे किंवा किमान वेतन अदा करावे. जेणे करून कर्मचाऱ्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटेल.
- सुमित बाविस्कर, आरोग्य कर्मचारी
कोट....
कोरोना काळात कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कामकाज केले आहे. आतादेखील कोरोनाची भयानक परिस्थिती असताना पूर्णवेळ सेवा दिली जात आहे. ओव्हरटाइम करूनही कमी मानधन मिळते. मानधनात वाढ करावी.
- योगेश साेनवणे, आरोग्य कर्मचारी
कोट....
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तब्बल २४ तास कामकाज करावे लागले. शहराची परिस्थिती लक्षात घेऊन व जबाबदारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून कामात झोकून दिले आहे. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नेमणूक द्यावी.
- मतीन अन्सारी, आरोग्य कर्मचारी
-----फोटो- ०४ मालेगाव इन्शुअरन्स १/२
ग्राफ
एकूण कर्मचारी : २५५९
कंत्राटी कर्मचारी : २२५९
काेविड सेंटर : ४