महामंडळाला खासगी वाहतुकीचा अडसर
By Admin | Updated: July 14, 2014 00:29 IST2014-07-13T23:27:43+5:302014-07-14T00:29:48+5:30
महामंडळाला खासगी वाहतुकीचा अडसर

महामंडळाला खासगी वाहतुकीचा अडसर
नाशिक : शहरातील प्रवासी वाहतूक करताना प्रसंगी तोट्यात राहून समाजातील सर्वच स्तरातील घटकांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेसला खासगी विनापरवाना वाहतुकीचा मोठा फटका बसत असून, या विनापरवानगी चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी प्रसंगी तोटा सहन करून केवळ बोटावर मोजता येतील इतक्या प्रवाशांना घेऊन वाहतूक करणाऱ्या शहर बससेवेचे कंबरडे मोडले आहे. जास्त प्रवासी मिळविण्यासाठी एसटीचे प्रयत्न सुरू असताना, अनेक ठिकाणी प्रवासी वाहतुकीचा परवाना नसणाऱ्या अनेक बसेस शहरात बिनदिक्कत प्रवासी वाहतूक करीत आहेत.
शहरापासून जवळ असलेल्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी खासगी बसेसचा वापर केला जातो. औद्योगिक वसाहतीतही मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांचा वापर होतो. ही वाहतूक करताना त्यांच्याकडून प्रवाशांची पळवापळवी सुरू असते. त्यामुळे दिवसातून दोनदा असा प्रकार धरला तरी सुमारे ५० बसेसमधून हजारो प्रवाशांची वाहतूक विनापरवाना होत असते. त्यामुळे एसटीचा तोटा तर होतोच; परंतु कारवाई होत नसल्याने विनापरवाना वाहतुकीलाही चालना मिळते आहे.
अशीच विनापरवाना वाहतूक सुरू राहिल्यास एसटीला व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच अवैध प्रवासी वाहतूक रोखा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)