नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ
By Admin | Updated: July 16, 2017 00:39 IST2017-07-16T00:38:58+5:302017-07-16T00:39:34+5:30
नाशिक महापालिकेतील नगरसेवकांना आता दरमहा १५ हजार रुपये मानधन आणि त्याव्यतिरिक्त बैठकभत्ता प्राप्त होणार आहे.

नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वाढत्या महागाईचा फटका लोकसेवकांनाही बसणारच. प्रभागांमध्ये भटकंती, दूरध्वनीचा वापर, स्टेशनरी, टपाल यासाठी खिशाला लागणारी झळ कोणी सोसायची? त्यामुळेच शासनाने लोकसेवकांना खुशखबर दिली असून, महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेतील नगरसेवकांना आता दरमहा १५ हजार रुपये मानधन आणि त्याव्यतिरिक्त बैठकभत्ता प्राप्त होणार आहे. शासनाने राज्यभरातील महापालिकांच्या नगरसेवकांचे मानधन सन २०१० मध्ये निश्चित केले होते. मात्र, वाढती महागाई लक्षात घेता नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, राज्याच्या नगरविकास विभागाने नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अ’ प्लस वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा २५ हजार, ‘अ’ वर्गातील महापालिका नगरसेवकांना दरमहा २० हजार, ‘ब’ वर्ग महापालिका नगरसेवकांना दरमहा १५ हजार तर ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. नाशिक महापालिका ही ‘ब’ वर्गात मोडते. त्यामुळे नगरसेवकांना १५ हजार रुपये प्रतिमाह मानधन मिळणार आहे. यापूर्वी २०१० पासून नगरसेवकांना प्रतिमाह ७,५०० रुपये मानधन अदा करण्यात येत होते. याशिवाय, नगरसेवकांना प्रत्येक महिन्यात होणाऱ्या प्रभाग समिती, स्थायी समिती, महासभा, महिला व बालकल्याण समिती यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यास प्रति बैठक १०० रुपये बैठक भत्ताही दिला जातो. नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीही नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार, नगरसचिव विभागाने दरमहा १० हजार रुपये मानधनाचा प्रस्तावही शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. आता शासनाने नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेला आता १२७ नगरसेवकांच्या मानधनापोटी दरमहा १९ लाख ५ हजार तर वार्षिक २ कोटी २८ लाख लाख रुपये अदा करावे लागणार आहे.
मानधनात झालेली वाढ
कालावधी मानधन
१९९२ ते २००१ १,५००
२००१ ते २००५ ३,०००
२००५ ते २०१० ४,०००
२०१० ते २०१७ ७,५००
२०१७ पासून १५,०००