कोरोनाची कृपा : निकालाची लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:23+5:302021-07-19T04:11:23+5:30
अनेकदा चर्चा झालेल्या दहावीचा निकाल अखेर शुक्रवारी जाहीर झाला. अंतर्गत गुणांचे मूल्यमापन झाले आणि विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर ...

कोरोनाची कृपा : निकालाची लॉटरी
अनेकदा चर्चा झालेल्या दहावीचा निकाल अखेर शुक्रवारी जाहीर झाला. अंतर्गत गुणांचे मूल्यमापन झाले आणि विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल काय लागणार हे माहीत असल्याने गुण किती मिळतात एव्हढाच काय तो प्रश्न होता. त्यामुळे निकालापेक्षा गुणांची उत्सुकता पालकांनाही होती. या निकालाबाबत आता विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून बऱ्यावाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या मुलाच्या ‘कतृत्वाची’ जाणीव असलेल्या एका पालकाने दिलेली प्रतिक्रिया मोठी बोलकी होती. इमारतीतील त्यांच्याच एका मित्राने चिरंजिवाने काय दिवे लावले असे विचारले असता त्या पित्याने हसत हसतच निकालाची लॉटरी लागली म्हणून बरे असे उत्तर देत कोरोनाची कृपा म्हणून कोरोनालाही धन्यवाद दिले.
कंडक्टर साहेब, बेल द्या
कंडक्टरने सिंगल बेल वाजवली की बस थांबायची आणि डबल बेल दिली की बस निघायची ही व्यवस्था महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच माहिती झालेली आहे. पुढे कोणता थांबा आला आहे असे कंडक्टरही सांगत असल्याने प्रवाशांना पुरेशी माहिती मिळत होती. महापालिकेने सुरू केलेल्या आधुनिक शहर बसेसमध्ये मात्र पुढील थांबा कोणता आहे याची आगाऊ सूचना देणारे ॲटोमॅटिक लोकेशन व्हाइस सिस्टीम आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांना पुढील थांबा कोणता हे कळतेही. इतके दिवस महामंडळाच्या बसमधून प्रवास करण्याची सवय असल्याने इच्छित स्थळी उतरण्यासाठी दाराजवळ येऊन उभे राहाण्याची प्रवाशांची सवय काही गेलेली नाही. त्यामुळे मनपाच्या बसमधून प्रवास करतानाही काही प्रवासी दरवाजाजवळ येताच कंडक्टराला बेल वाजवा अशी सूचना करीत असल्याचे किस्से घडत आहेत.
(कुजबुज)