कोरोना लस आठवडाभरात होणार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 00:55 IST2021-01-10T00:55:06+5:302021-01-10T00:55:24+5:30
नाशिक : देशात एकाच वेळी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या ड्राय रनच्या यशस्वितेमुळे उत्साह दुणावलेल्या आरोग्य मंत्रालयाने येत्या आठवडाभरात लस उपलब्ध करून देण्याचे ठरविले असून, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात १८ ते २० जानेवारीपर्यंत लस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना लस देण्यात येणार असून, त्यासाठी माहिती गोळा करण्यात आली आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेच्या अखत्यारित १८,१३५ अधिकारी, कर्मचारी असून, १२,४८० खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहेत. पहिल्या टप्प्यात या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी १,०२९ लसटोचकांना प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले आहे.
याच कर्मचाऱ्यांच्या बळावर शुक्रवारी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ड्राय रन घेण्यात येऊन आरोग्य यंत्रणेची तयारी चाचपण्यात आली. त्यात लाभार्थ्यांचे कोविन ॲपमध्ये रजिष्टर करण्यापासून तर लस टोचल्यानंतर संभाव्य त्रास झाल्यास रुग्णालयात दाखल करेपर्यंतची रंगीत तालीम करण्यात आली. त्यात कोठेही त्रुटी निदर्शनास न आल्याचा अहवाल आरोग्य विभागाला पाठविण्यात आला आहे. देशपातळीवरच आरोग्य यंत्रणेची तयारी पूर्ण झाल्याचे पाहून पुढच्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील लस उपलब्ध करून देण्याचे ठरविले
आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची त्यासाठी तयारी पूर्ण झाल्याचे डॉ.आहेर यांनी सांगितले.